राजेश शेगोकार ल्ल बुलडाणावर्धा, गडचिरोलीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याच्या मागणीसाठी विविध महिला संघटनांनी सरकार दबाव आणला होता़ महिलांच्या या रेट्यापुढे झुकत अखेर राज्य सरकारने चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय जाहीर केला आहे़ एकीकडे दारूबंदीसाठी महिला संघर्ष करीत असताना, या प्रयत्नांना खीळ घालण्याचे प्रयत्न महिलांकडूनच होत असल्याचे आढळून आले आहे़ राज्यभरात महिलांच्या नावावर बिअर बार व दारू विक्रीचे परवाने घेणाऱ्यांची संख्या जवळपास २० टक्के असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ अमरावती तसेच बुलडाणा जिल्ह्यातही दारूबंदीसाठी सामाजिक संघटना, महिला बचत गट पुढे आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २३२ बीअर बार व परमिट रूम आहेत. यापैकी ४५ बार व परमिट रूमची मालकी महिलांकडे आहे. याशिवाय ४ बारमध्ये महिलांची भागीदारी आहे. वाशिम जिल्ह्यात १०५ परवाने असून, त्यापैकी १० दुकाने बंद आहेत; मात्र उरलेल्या बीअर बारमध्ये २२ परवाने महिलांच्या नावे आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये २४८ मद्यविक्रीची दुकाने असून, त्यापैकी ६५ परवाने महिलांच्या नावे आहेत. दारूची नशा संसाराची राखरांगोळी करते. सुखी संसाराची वाताहत होण्यासाठी दारू हे एक मोठे कारण आहे. दारूमुळे आजवर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा या दारूला वेशीबाहेर काढण्यासाठी मागील दोन वर्षांत अनेक गावांमधून महिला संघटना, तसेच बचत गटाच्या महिलांनी ‘एल्गार’ पुकारला. काही ठिकाणी या आंदोलनाला यश येऊन उभी बाटली आडवी झाली तर, काही ठिकाणी महिलांचा लढा सुरूच आहे. एकीकडे काही सामाजिक कार्यकर्त्या, महिला दारूबंदीसाठी चळवळ उभी करून लढा देताना दिसतात, तर दुसरीकडे याच जिल्ह्यात महिलांच्या नावाने बीअर बार, वाइन शॉपीचे परवाने दिसत असल्यामुळे या आंदोलनाला छेद दिला जात आहे.च्जिल्ह्यात एकूण २३२ बीअर बार आहेत. त्यापैकी ४५ बारचे परवाने महिलांच्या नावाने आहेत. यामध्ये बुलडाणा शहर व परिसरात १० परवाने महिलांच्या नावे आहेत. त्याखालोखाल ४ परवाने चिखली, तर खामगाव आणि देऊळगावराजा येथे प्रत्येकी ३ परवाने आहेत. सिंदखेडराजा आणि नांदुरा येथे प्रत्येकी २ परवाने महिलांच्या नावावर आहेत. मलकापूर, उंद्री, सोनाळा, असलगाव, सावखेड भोई, बोराखेडी बावरा, साखरखेर्डा, शेगाव मेरा फाटा, लोणार, धाड, पिंप्री आंधळे, जळगाव जामोद, वाडी असलगाव, मेहकर, वाकोडी मलकापूर, शेंदुर्जन आणि आंबेटाकळी येथे प्रत्येकी एक दुकान महिलांच्या नावे आहे. याशिवाय ४ बीअर बारमध्ये महिला भागीदार आहेत.महिलांच्याच नावे का ?बियर बार, परमिट रूम, वाईन शॉप किंवा देशी दारूचे दुकान महिलांच्या नावावर घेण्यासाठी शासनाची कुठलीही सवलत नाही. मात्र अनेकदा पुरूषांना त्यांच्या नावाची अडचण वाटते म्हणून महिलांचे नाव पुढे केले जाते. पश्चिम वऱ्हाडात अनेक सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढारी यांच्या पत्नीच्या नावाने अशा प्रकारचे परवाने असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोल्यात देशी दारूचे २९ परवाने महिलांकडेदेशी दारूमुळे गावागावांत महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत; मात्र देशी दारूचेही परवाने महिलांच्या नावे घेऊन दुकानदारी थाटणारे महाभाग आहेत. अकोला जिल्ह्यात देशी दारूचे ७९ परवाने असून, त्यापैकी २९ परवाने महिलांच्या नावे आहेत. विशेष म्हणजे बीअर शॉपीचे ३, तर वाइन शॉपीचे ६ परवाने महिलांच्या नावे आहेत.महिलांच्या नावावर दुकाने घेऊन संसाराची राखरांगोळी करण्याचा डाव महिलांनीच हाणून पाडला पाहिजे. शासनानेही महिलांच्या नावे असणारे परवाने रद्द करून ती दुकाने बंद केली पाहिजेत. भविष्यात असे परवाने देण्यात येऊ नयेत, यासाठी लढा दिला जाईल. - प्रेमलता सोनोने,दारूबंदीसाठी झटणारी कार्यकर्ता