पुणे : राज्यातील काही जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये अपंगासाठीचे आरक्षण नमुद करण्यात आले नव्हते. त्यामुळे अपंगांचा अधिकार डावलला गेला असून या जाहिरातींमध्ये अपंगाचे आरक्षण नमुद करावे, असा आदेश अपंग कल्याण आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना दिला आहे.अपंग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत ३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार अ, ब, क, ड या प्रवर्गांतील पदभरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करताना त्यामध्ये अपंग व्यक्तींसाठीच्या आरक्षित जागा नमुद करणे आवश्यक असते. मात्र अहमदनगर, नाशिक, जळगाव, अकोला, रायगड यांसह काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी लिपिक, टंकलेखक, तलाठी, शिपाई या संवर्गाच्या जाहिराती अपंगांसाठीचे आरक्षण नमुद न करता प्रसिध्द करण्यात आल्या. याच जाहिरातींमध्ये मात्र महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांच्यासाठीचे आरक्षण नमुद केले होते. याबाबत किशोर चौधरी यांनी अपंग कल्याण आयुक्तालयाकडे तक्रार केली होती. पदभरतीची जाहिरात देताना अपंगांसाठी जागा नसली तरी तसे जाहिरातीत नमुद करणे अपेक्षित आहे. असे या जाहिरातीत नसल्याने अपंगाचे हक्क डावलले गेल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणुन दिले. आयुक्तालयानेही हे म्हणणे ग्राह्य धरीत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांना तसे आदेश दिले आहेत. संबंधित पदभरतीच्या जाहिरातीत अपंगाचे आरक्षण नमुद करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
पदभरतीच्या जाहिरातींमध्ये अपंगांचे आरक्षण नमुद करा
By admin | Updated: June 10, 2014 23:45 IST