सुरेश लोखंडे,ठाणे- राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. राज्यातील ६१ तालुक्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांतील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या प्रश्नावर आर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच मुंबई मंडलच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील डॉक्टरांना शनिवारी धारेवर धरले.माता, बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेले आदिवासी तालुके संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, भिवंडी, मुरबाड या तीन तालुक्यांतील आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील १५ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यात, पालघर जिल्ह्यातील सुमारे सहा तालुके आहेत. यातील माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागाला नवसंजीवनी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात वर्षभर झालेल्या माता, बालमृत्यूंचा आढावा बैठक रावखंडे यांनी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेतली.जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरास लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातही २११ कुपोषण व बालमृत्यू मोठ्या प्रमाणात झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन येथील आदिवासी, दुर्गम भाग नवसंजीवनी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात सुमारे ९० बालमृत्यू, तर पाच मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे अहवालाअंती उघड झाले. यातील दोन माता रुग्णालयात, दोन रस्त्यावर आणि एक माता घरी प्रसूतीदरम्यान दगावली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ ला २०० बालकांसह २५ मातांचा मृत्यू झाल्यामुळे या वर्षाचे हे प्रमाण कमी आहे. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी भिवंडीच्या तीन आरोग्य केंद्रांसह शहापूरच्या नऊ आणि मुरबाड तालुक्यातील तीन आरोग्य केंद्रांच्या नियंत्रणातील गावपाड्यांमध्ये नवसंजीवनी योजना लागू केली आहे.>जिल्ह्यातील माता बालमृत्यूपाच वर्षांत ५९ माता विविध आजारांनी दगावल्या आहेत. याशिवाय, मागील पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या ५९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामधील २०१५ ला ५३ बालके विविध कारणांनी दगावले आहेत. २०१२-१३ मध्ये सर्वाधिक २५६ बालकांचा, तर २०१३-१४ मध्ये २३३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद या पाच वर्षांत करण्यात आली आहे. याप्रमाणेच एक हजार ६२९ अर्भक पाच वर्षांत दगावले आहेत.
अधिवेशनात कुपोषण मुद्दा गाजणार
By admin | Updated: March 6, 2017 04:11 IST