Maharashtra Election 2019: Voters hear Gopichand Padalkar's request; Baramati defeated | महाराष्ट्र निवडणूक २०१९: गोपीचंद पडळकरांची 'ती' विनंती मतदारांनी ऐकली; बारामतीत झाला पराभव
महाराष्ट्र निवडणूक २०१९: गोपीचंद पडळकरांची 'ती' विनंती मतदारांनी ऐकली; बारामतीत झाला पराभव

मुंबई - विधानसभेच्या निकाल लागलेला आहे. राज्यभरात महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल दिला असला तरी महाआघाडीच्या जागांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाने इतर पक्षातील लोकांना मोठी मेगाभरती केली होती. अनेक पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना भाजपाने तिकीट देऊन जास्तीत जास्त जिंकून आणण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्रातील जनतेने आयारामांना नाकारलं असल्याचं चित्र आहे. 

वंचित बहुजन आघाडीमध्ये नेते असलेले गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात घेतलेल्या मतांनी चर्चेत आले होते. गोपीचंद पडळकर यांच्या रुपाने वंचितला पश्चिम महाराष्ट्रात मोठा चेहरा मिळाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या भाषण शैलीने अनेक तरुण प्रभावित होते. त्याचा परिणाम म्हणून अडीच लाखांहून अधिक मते गोपीचंद पडळकरांच्या पारड्यात टाकली होती. 

मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोपीचंद पडळकर यांनी भाजपात प्रवेश करत वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पडळकरांचा प्रवेश झाला. स्वत: मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकर या वाघाला बारामतीत उभं करुया असं विधान केलं होतं. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी गोपीचंद पडळकर हे भाजपातून बाहेर पडत राज्यभर धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा त्यांनी सुरु केला होता. त्यावेळी बिरोबाची शपथ घेऊन सांगतो, माझी आई असो भाऊ असो किंवा मी स्वत: भाजपात गेलो अन् निवडणुकीला उभं राहिलो तरी मला मतदान करु नका असं विधान केलं होतं. 

बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांचा एक लाखांच्या मताधिक्यांनी पराभव करणार असं सांगितले होतं. प्रत्यक्षात घडलंही तसेच. अजित पवारांना बारामतीत १ लाख ९४ हजार ३०० मते मिळाली तर गोपीचंद पडळकर यांना ३० हजार २८२ मते मिळाली. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिटही जप्त झालं. गोपीचंद पडळकरांच्या या पराभवामुळे पुन्हा एकदा पडळकरांनी केलेली विनंती खरोखरचं लोकांनी ऐकली का अशी चर्चा सुरु झाली आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: Voters hear Gopichand Padalkar's request; Baramati defeated

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.