जयेश शिरसाट, मुंबई गेल्या आठवड्यात वाकोला पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबाराने शासनकर्त्यांसाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. या वेळी तरी शासनकर्ते ती ऐकतील आणि पोलिसांचे जगणे सुसह्य करतील, त्यांच्यावरील कामाचा बोजा, ताण कमी करण्यासाठी योग्य नियोजन करतील, अशी अपेक्षा मुंबईसह राज्यातील पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.वाकोला पोलीस ठाण्यातील एएसआय दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांची सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ही त्याच रिव्हॉल्वरने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडणारे शिर्के दोनवर्षांत निवृत्त होणार होते. साधारण तीस वर्षे त्यांनी खात्यात कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पश्चात स्वत:च्या पायावर उभी नसलेली तीन मुले व पत्नी असा परिवार आहे. असे असताना अनुभवी शिर्केंनी टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर पोलीस दलातून बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कोणी म्हणाले, ही घटना क्षणिक वादातून घडली. तर कोण म्हणते, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदारी, वरिष्ठांचा सातत्याने सुरू असलेला जाच यातून शिर्केंच्या मनात साचलेल्या असंतोषाचा स्फोट झाला असावा.मात्र या घटनेनंतर पोलीस दलात अप्रत्यक्षरीत्या दुुफळी निर्माण झाली आहे. अधिकारीवर्ग गोळीबारात ठार झालेल्या जोशींच्या बाजूने आणि गोळी झाडणाऱ्या शिर्केंच्या विरोधात बोलत आहे, तर शिपाईवर्ग आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून शिर्केंना सहानुभूती मिळते आहे. मुंबईत ४० हजार पोलीस आहेत. प्रत्येक पोलीस तणावाखाली आहे. म्हणून तो शस्त्र हाती घेत नाही. शिर्के यांची तक्रार होती तर ती त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करायला हवी होती. गोळ्या झाडून वरिष्ठ अधिकाऱ्याला ठार करणे हा गुन्हा आहे. शिवाय आत्महत्या करून शिर्केंनी स्वत:चे कुटुंबही वाऱ्यावर आणले, अशी प्रतिक्रिया एका वर्गातून उमटते आहे तर दुसरीकडे शिर्केंच्या निमित्ताने बेहिशेबी काम, त्याबदल्यात मिळणारे तुटपुंजे वेतन, जबाबदारी, कर्तव्यात जरा कसूर झाली की शिक्षा, वरिष्ठांचा जाच, निवाऱ्याचा पत्ता नाही, जेवणाची आबाळ, कुटुंब असून नसल्यासारखे, सण-उत्सवात, उन्हा-पावसात उघड्यावर ड्युटी, कुठे काही घडले तर सुरक्षेच्या नावाखाली सुट्या रद्द याचा हिशोब मांडला जातोय. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांमधून असंतोष खदखदू लागला आहे. गृहमंत्रीपदाचा भार सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच या असंतोषावर अचूक नियोजनाची फुंकर मारावी. अन्यथा हा असंतोष असाच भडकत राहील.पोलीस पत्नींची व्यथा१शिर्केंच्या अंत्यदर्शनासाठी वाकोल्याच्या कोलेकल्याण वसाहतीतल्या पोलीस पत्नी मोठ्या संख्येने हजर होत्या. त्यांच्या प्रतिक्रिया तर मन विषण्ण करून जातात. लग्न, वाढदिवस हे आनंदाचे क्षण सोडाच पण कोणाच्या दु:खातही आम्ही सहभागी होऊ शकत नाही. जवळच्या नातेवाइकाच्या मयतालाही जाता येत नाही. कामावरचे सर्व फ्रस्ट्रेशन यांच्यासोबत घरी येते. २कधी तरी येणारा ताणतणाव, मानसिक संघर्षाची स्थिती समजून घेता येते. पण ते रोजचेच असेल तर पोलीस काय करणार? त्यामुळे आमच्या घरातही पोलीस ठाण्यासारखेच कोंदट वातावरण असते. तोच तणाव असतो. व्यक्तच होता येत नाही. पतीप्रमाणे निमूटपणे सगळी घुसमट मनात साठविण्याशिवाय पर्याय नसतो. सतत या वातावरणात राहून पोलीस पत्नीही आजारी पडतात. ३मुलांकडे लक्ष देता येत नाही. गाठीला म्हणावा तेवढा पैसाही नाही. त्यामुळे त्यांना चांगले शिक्षण देता येत नाही. मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य कोणत्या क्षेत्रात रस असेल तर ती हौस मारावी लागते. यातून मुलेही फ्रस्ट्रेट होतात. आडमार्गाला लागतात. त्यामुळे आम्ही या निर्णयावर आलो आहोत की काहीही झाले तरी मुलांना पोलीस खात्यात धाडायचे नाही. कुचंबणा कधी दूर होणार?शिर्के रात्रपाळीत नेमून दिलेल्या पॉइंटवर नव्हते. वरिष्ठांनी दोन वेळा गस्त घातली. दोन्ही वेळा ते तेथे हजर नव्हते. त्यामुळे त्यांची गैरहजेरी लावण्यात आली. हे गोळीबाराचे निमित्त होते. प्रत्यक्षात पोलिसांची एक पाळी १२ तासांची. हद्दीतले सर्व पॉइंट्स उघड्यावर. सध्या उन्हाळा सुरू आहे. अशात पोलीस शिपाई अंगात जड खाकी वर्दी घालून १२ तास एकाच जागी कसा उभा राहू शकेल. तो घामाने भिजतो. त्याला मच्छर चावतात. नैसर्गिक विधी उघड्यावर आटपावे लागतात. खाण्याचे सोडा, पिण्याच्या पाण्याचीही सोय अशा पॉइंट्सवर नाही. १२ तासांच्या ड्युटीत महत्त्वाचा गुन्हा घडला, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वसामान्यपणे पोलिसांना १८ ते २० तासही ड्युटी करावी लागते. ती आटोपून दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीच्या पाळीत हजर राहावे लागते. आठ तासांची ड्युटी का नाही?पोलिसांना १२ तासांऐवजी ८ तासांची ड्युटी करावी. तीन शिफ्टमध्ये पोलीस काम करतील. त्यांचा पगार वाढवावा. आठवड्यातून एक हक्काची सुटी न चुकता द्यावी. छोट्या-मोठ्या कारणांवरून सुट्या रद्द करू नयेत. हे बदल झाल्यास पोलिसांना कुटुंबासाठी, स्वत:साठी, समाजासाठी वेळ देता येईल. मनाने आणि शरीरानेही ते ताजेतवाने राहतील आणि चांगली कामगिरी करू शकतील. त्यानंतरच पोलिसांकडून अपेक्षा करता येतील.
पोलिसांकडे माणूस म्हणून बघा
By admin | Updated: May 6, 2015 01:52 IST