मुंबई : गावठी दारूच्या भटटया कुठेही लागोत पण ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेला काळा गूळ, कीक वाढविण्यासाठी दारूत मिसळले जाणारे नवसागर, भेसळीसाठी मिळणारे स्पीरीट, मिथेनॉल ते खास बनावटीच्या भांडयांपर्यंत सर्वच साहित्य मुंबईच्या बाजारपेठांमध्ये सहजरित्या उपलब्ध होते, अशी माहिती समोर आली आहे.पुर्वी नॅशनलपार्कमधले आदिवासी पाडे, भांडुप कॉम्प्लेक्सजवळील जंगल, पवईतील आदिवासी पाडे,, खारदांडयात गावठी दारूच्या मोठया भटटया राजरोस लागत. कालांतराने पोलीस कारवाईने या मोठया भटटयांवर गंडांतर आले. पुढे या भटटया पोलिसांची नजर चुकवून किंवा त्यांना विश्वासात घेऊन लागू लागल्या. मात्र अनेकठिकाणी मोठया भटटयांऐवजी घरगुती भटटया सुरू केल्या. आजही अशा घरगुती भटटया सुरू आहेत. मोठया भटटयांसाठी लागणारी मोठमोठी भांडी बदलून आता पिठाच्या डब्याच्या आकाराच्या भांडयांमध्ये घरगुती दारू गाळली जाते. अशाचप्रकारे दारू गाळणाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार बाजारात दारू गाळण्यासाठी आवश्यक असलेली हवी तशी, हव्या त्या आकाराची भांडी सहजपणे मिळतात. नेहमीचा, ओळखीचा चेहेरा असेल तर किराणा दुकानांमध्ये काळा गूळही सहज मिळतो. नवसागर, स्पीरीट, युरीया, शेणखतही आरामात उपलब्ध होते. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार मुंबादेवीत दारू गाळण्यासाठी आवश्यक भांडी बनवून दिली जातात.तांदूळ, वेलची, बडीशेप, जिऱ्याचीही गावठी : गावठी दारू गाळणारे फ्लेव्हरसाठी निरनिराळी फळे काळया गुळाच्या पाण्यात कुजवतात. त्यात अननस, जांभूळ, मोसंबीच्या सालींचा वापर केला जातो. खजूराचीही गावठी ऐकीवात आहे. पण दारू गाळणारे अगदी तांदूळ, जीरे, वेलची, बडीशेप, चहापत्तीपासूनही गावठी तयार करतात. यापैकी वेलचीची गावठी सर्वात उग्र असते, असे काहींचे म्हणणे आहे.मिथेनॉलऐवजी स्पीरीट, युरीया, शेणखतही : गावठी दारूची उग्रता किंवा कीक वाढविण्यासाठी त्यात मिथेनॉल किंवा मिथाईल मिसळले जाते. तर मिथेनॉलऐवजी दारू कडक करण्यासाठी युरीया, शेणखत आणि स्पीरीटही गाळलेल्या दारूत मिसळवले जाते, अशी माहिती पुढे आली आहे.निळी ज्वाळा...पहिल्या धारेची : काळया गुळात कुजवलेली फळे किंवा धान्य शिजवले जाते. त्याच्या वाफेपासून दारू तयार होते. तयार झालेली दारू लाकडावर शिंपडून जाळली जाते. ज्वाळा निळी आली तर पहिल्या धारेची. लाल आली तर पाणचट. लाकडाने पेटच घेतला नाही तर भटटीवरल्या तपेल्यातले कुजलेले मिश्रण बदलण्याची वेळ.राज्यपाल विद्यासागर राव यांनी मालवणी येथे विषारी दारू दुर्घटनेत झालेल्या मोठ्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. घरातील कर्त्या व्यक्ती मरण पावल्यामुळे अनेक निरपराधी कुटुंबियांवर या दुर्घटनेमुळे आभाळ कोसळले आहे. यांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. दोन दिवसात २०० ठिकाणी धाडीमालवणी दारूकांडानंतर उत्तर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसात तेथील पोलिसांनी तब्बल दोनशेहून अधिक ठिकाणी धाडी घातल्या. त्यापैकी २० ते २५ ठिकाणी गुत्ते सुरू होते. कारवाई संपूर्ण शहरात सुरू असून गेल्या दोन दिवसात संशयित सर्वच ठिकाणी धाडी घालून पोलिसांनी गुत्त्यांवरून किंवा घरातून गावठी किंवा अवैधपणे देशी दारू विकणाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती मिळते. शहरात गावठी दारूचे रॅकेट सुरू होते आणि गुत्त्यांवरून गावठी दारूची विक्री सुरू होती हे स्पष्ट झाले आहे. अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष - अशोक चव्हाणअवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असती तर मालवणीमधील दारुबळी रोखता आले असते, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. मालवणीमधील घटना ही सरकारी अनास्थेचा परिपाक आहे. पोलीस, उत्पादन शुल्क विभागाचा ढिसाळ कारभार मालवणीच्या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
‘गावठी’चे साहित्य सहज उपलब्ध
By admin | Updated: June 21, 2015 01:44 IST