मुंबई : मुंबई शहरआणि उपनगरवासियांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या लोकल सेवेला शुक्रवारी पावसाचा सर्वात मोठा तडाखा बसला. पावसामुळे बारा तासांपेक्षा जास्त वेळ पश्चिम तसेच मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बर रेल्वे ठप्प राहिली. पावसाळापूर्व केलेल्या कामांमुळे लोकल सेवा सुरळीत राहिल असा दावा करणाऱ्या पश्चिम आणि मध्य रेल्वेचा दावा मात्र यामुळे पूर्णपणे फोल ठरला. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक पावसाळ्यात सुरळीतपणे सुरु असलेली पश्चिम रेल्वे यावेळी पहिल्यांदाच ठप्प झाली. गुरुवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसाने संध्याकाळपासून चांगलाच जोर पकडला आणि त्याचाच फटका शुक्रवारी रेल्वेच्या तीन्ही मार्गांना बसला. शुक्रवारीही पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रेल्वेच्या तीन्ही मार्गावरील लोकल सेवा सकाळी सहा वाजल्यापासून बंद होण्यास सुरुवात झाली. यात पहिला फटका बसला तो मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंतच्या आणि त्यानंतर सीएसटी ते पनवेल, वाशी या हार्बर मार्गाला. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर दादर, सायन, कुर्ला, विद्याविहार, परेल, भायखळा, करी रोड आणि भांडुप तर हार्बर मार्गावरील वडाळा, टिळक नगर, चेंबूर, कुर्ला आणि वाशी येथील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळी कामावर जाणारे चाकरमानी लोकल पकडण्यासाठी नेहमीप्रमाणे स्थानकांवर आले आणि मात्र तास, दोन तास वाट पाहून अनेक जण पुन्हा घराची वाट धरत होते. बहुतेक स्थानकांवरील इंटीकेटर्स आणि उद्घोषणा बंद असल्याने नक्की लोकल सुरु होणार कधी याची माहीती प्रवाशांना मिळत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवासी स्थानकांवर लोकलची वाट पाहताना दिसत होते. मात्र लोकल सुरु नसल्याचे अन्य प्रवाशांकडून आणि नातेवाईकांकडून समजताच प्रवाशांकडून रेल्वेला लाखोली वाहण्यात येत होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे ते कर्जत, कसारा तसेच वाशी-पनवेल मार्गावर शटल सेवा सुरु करण्यात आली. मात्र या सेवेलासुध्दा बराच वेळाने धावत असल्याने प्रवाशांना त्याचा फारसा फायदा मिळत नव्हता. तर सीएसटी ते ठाणे या मार्गावरील वाहतुक दिवसभर पूर्णपणे बंदच ठेवण्यात आली होती. नौदलाचीही तयारीगुरुवारपासून सुरु झालेल्या पावसाने शुक्रवारी दिवसभर चांगलाच जोर पकडला. त्यामुळे मुंबापुरी चांगली तुंबली आणि अनेक सेवांवर त्याचा परिणाम झाला. हे पाहता नौदलाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली. बोट आणि बचाव पथक तयार ठेवतानाच हेलिकॉप्टरही मुंबईच्या किनाऱ्यावर तैनात करण्यात आले. त्याचबरोबर आयएनएस शिक्रा आणि जहाजांचीही तयारी ठेवण्यात आल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. दरवर्षी सरासरी २४०० मि़मी़ पाऊस पडतो़ यापैकी ३०० मि़मी़ पाऊस गेल्या २४ तासांमध्ये पडला आहे़२0 मेल-एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्यामध्य रेल्वे मार्गावरुन मुंबईत येणाऱ्या वीस मेल-एक्सप्रेस गाड्या ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे दहा ठिकाणी चांगल्याच खोळंबल्या. यामध्ये सीएसटी येथे कोणार्क आणि कन्याकुमारी एक्सप्रेस, दादर येथे हावडा-मुंबई एक्सप्रेस आणि हुस्सेन सागर एक्सप्रेस, माटुंगा येथे सोलापूर-मुंबई एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेस, कुर्ला येथे चालुक्या एक्सप्रेस, विद्याविहार येथे अमरावती एक्सप्रेस आणि विदर्भ एक्सप्रेस, घाटकोपर येथे देवगिरी एक्सप्रेस, सिध्देश्वर एक्सप्रेस आणि दुरोन्तो एक्सप्रेस, विक्रोळी येथे महालक्ष्मी एक्सप्रेस, कांजुरमार्ग येथे बिजापुर पॅसेंजर, भांडुप येथे लातूर एक्सप्रेस, दिवा येथे नेत्रावती एक्सप्रेस, मेंगलोर एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस आणि राजेन्द्रनगर एक्सप्रेसचा समावेश होता.डबेवाल्यांची रेल्वेमुळे सेवा ठप्पअविरत सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवाही शुक्रवारी बंद होती. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे बंद पडल्याने कर्मचारी वर्गही अनुपस्थित होता. त्यामुळेच सेवा बंद ठेवल्याचे डबेवाला संघटनेचे प्रमुख रघुनाथ मेदगे यांनी सांगितले. शनिवारी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असला, तरी डबेवालांच्या सेवा सुरूच राहील. मात्र रेल्वे ठप्प पडल्यास डबेवाल्यांची सेवाही बंद ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.आली रे आली, भरती आली...माटुंग्यामधील गांधी मार्केट, हिंदमाता, दादर टीटी, वाकोल्यातील मिलन सब वे आणि सायन सर्कल या प्रमुख ठिकाणी कंबरेपर्यंत पावसाचे पाणी साचले. या प्रमुख ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसविण्यात आले होते. परंतु ऐन दुपारी आलेल्या भरतीने यंत्रणेचा घात केला. सतर्क असलेली यंत्रणा केवळ भरतीमुळे पावसाच्या पाण्याला मार्ग दाखवू शकली नाही. त्यामुळे साहजिकच रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाहून नेहमीच जाणाऱ्या वाहन चालकांना आज मात्र आपला मार्ग बदलावा लागला. सायंकाळी ७ नंतर मात्र पावसाचा जोर काहीसा ओसरला आणि सखोल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला.बँकांचे व्यवहारही ठप्पमुंबईला झोडपून काढलेल्या पावसामुळे शुक्रवारी मुंबईतील बहुतांश बँकाही बंद होत्या. काही प्रमाणात पोहचलेल्या कर्मचाऱ्यांनी बँका उघडल्या खऱ्या, मात्र इतर कर्मचाऱ्यांअभावी कोणतेही रोख व्यवहार होऊ शकले नाही. काही बँका बंद असतानाही काही बँकांनी अर्धे शटर बंद ठेवले होते. ८० टक्के बाजार बंदमुसळधार पावसामुळे सखोल भागात पाणी साचल्याने ठिकठिकाणच्या बाजारपेठा बंद होत्या. बाजारपेठांमध्ये सकाळी केवळ १० टक्के २० कर्मचारी वर्ग उपस्थित होता. ग्राहकांचीही वर्दळ नव्हती. परिणामी मुंबईतील ८० टक्के बाजार बंद होता. हा बाजार बंद असल्याने व्यापारी क्षेत्रातील तोट्याचा आकडा थेट ५०० कोटींवर पोहचला, असे फेडरेशन आॅफ रिटेल टे्रडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी सांगितले. शिवाय परेल, दादर आणि ग्रँटरोडमधील बाजारपेठांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचेही शहा यांनी नमूद केले.प्रामुख्याने येथे साचले पाणीमुंबई सेंट्रल, हिंदमाता, गांधी मार्केट, वडाळा, हिंदू कॉलनी, माटुंगा स्थानक, अॅन्टॉप, वरळी, मुलुंड, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द, वांद्रे, सांताक्रुझ, खार, अंधेरी, कांदिवली, दहिसर, बोरीवली.दक्षिण मुंबई : वीजपुरवठा खंडितपावसाने रौद्ररुप धारण केल्याने बेस्ट उपक्रमाने दक्षिण मुंबईसह ज्या ठिकाणी धोक्याच्या सूचना आहेत, अशा ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला होता. अपघात/ धोका टाळण्यासाठी मुंबईतील गीतानगर पंपिंग, आदर्श, साधू वासवानी मार्ग, कफ परेड ट्रंझिट या काही भागातील उपकेंद्रे बंद करून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. येथील तुंबलेले पाणी कमी होताच खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, अशा सूचनाही बेस्टने दिल्या होत्या.बेस्टच्या गाड्या गेल्या कुठे?लोकल ठप्प पडल्याने बेस्टने अतिरिक्त गाड्यांसह लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी गाड्या रस्त्यांवर उतरविल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या मुख्य रस्त्यांवर पाणी तुंबल्याने लांब पल्ल्यांसाठी बाहेर पडलेल्या गाड्या गंतव्य ठिकाणी वेळेवर पोहचू शकत नव्हत्या. दुर्देव म्हणजे मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडल्याने तासाभराने एक बेस्ट बस अशा अंतराने बेस्ट बस थांब्यावर दाखल होत होत्या. दरम्यान, मुंबईकरांना वीजपुरवठा पूर्ववत करण्यात तसेच बससेवा देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
लाइफलाइन थांबली!
By admin | Updated: June 19, 2015 23:01 IST