मुख्यमंत्र्यांची ग्वाही : ‘अॅग्रोव्हिजन’चे उद््घाटननागपूर : सरकार शेतकऱ्यांचे आहे. त्यांनी घाबरू नये. आमच्यावर विश्वास ठेवावा, त्यांच्या मदतीसाठी प्रसंगी कर्ज काढण्याची वेळ आली तर सरकार तेही करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आत्महत्या करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनगड, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी तर विशेष अतिथी म्हणून प्रदर्शनाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग कार्यक्रमाला येणार होते, पण संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने ते येऊ शकले नाही.राज्यातील शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. १५ हजार गावात दुष्काळ आहे. बाजारपेठेत शेतमालाला भाव नाही. वातावरणातील बदलाचाही शेतीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निराश होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राज्य शासनापुढे हे एक मोठे आव्हान आहे. उत्पादकता वाढविण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यासाठी सरकार पुढच्या काळात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणारच आहे. पण श्ोतकऱ्यांनी शासनावर विश्वास ठेवावा, त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रसंगी राज्य शासनाला कर्ज काढावे लागले तर तेही करण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.‘अॅग्रोव्हिजन’ हे फक्त प्रदर्शनच नाही तर ती एक चळवळ आहे. या माध्यमातून देश-विदेशातील शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचते. प्रदर्शनासाठी शेतकऱ्यांना आणणे व सोडून देण्यासाठी एसटी बसेससह इतरही आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास शासन तयार आहे, असेही फडणवीस म्हणाले.हमीभावाचे संरक्षण द्या : शेट्टीकेंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसतो. बाजारपेठेतील यंत्रणा त्याच्या हातात नसल्याने भाव मिळत नाही. सोयाबीनचे उत्पादन वाढले तर भाव पाडले जातात व कमी झाल्यावर बाजारपेठेत भाव मिळत असेल तर तेलाची आयात केली जाते.बाजारपेठेतील यंत्रणा शेतकऱ्यांना हमी देणारी असावी. शेतकऱ्यांना त्याच्या मालाची योग्य किंमत मिळाली तर तो विक्रमी उत्पादन करू शकतो व त्यामुळे आयातीवर खर्च होणारे विदेशी चलन वाचू शकेल, असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. जनुकीय बियाण्यांना होणाऱ्या विरोधावर त्यांनी टीका केली. या बियाण्यांना विरोध केला जातो. याच बियाण्यांपासून काढलेले तेल विदेशातून आयात केलेले आपल्याला चालते हा दुटप्पीपणा आहे, असे शेट्टी म्हणाले.संघटित बाजारपेठेची गरज : धनगडशेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास योग्य भाव हवा असेल तर त्यांनी संघटित बाजारपेठ तयार करावी. त्यामुळे त्यांना लाभ होईल, असे ओमप्रकाश धनगड म्हणाले. यावेळी सी.डी. मायी यांचेही भाषण झाले. सुरुवातीला स्वागतपर भाषण आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी यांनी केले. समितीचे सचिव रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार आयोजन समितीचे सचिव रमेश मानकर यांनी मानले. व्यासपीठावर खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख, अनिल सोले, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, राजकुमार पडोले, अनिल बोंडे, हरीश पिंपळे, पंकज भोयर, महापौर प्रवीण दटके, जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, माजी खासदार दत्ताजी मेघे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, डॉ. विकास महात्मे, रवींद्र दुरुगकर, राजीव पोतदार, श्रीधर ठाकरे, कृषी खात्याचे सचिव सुधीर गोयल यांच्यासह आयोजन समितीचे सर्व प्रमुख सदस्य आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत करा : गडकरीकृषी क्षेत्रात आलेले नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून प्राप्त केलेल्या ज्ञानाचे रूपांतर संपत्ती निर्माण करण्यासाठी केले तर शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल, असे प्रतिपादन ‘अॅग्रोव्हिजन’चे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सरकार बदलल्याने परिस्थिती बदलत नाही. सरकार मदत करू शकेल. पण शेतकऱ्यांनीही बदलत्या काळाची कास धरायला हवी. पारंपरिक पिके घेऊन परिस्थिती बदलणार नाही. शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी लागेल, असे गडकरी म्हणाले. शेतकरी इथेनॉल तयार करू शकतो. देशाला दरवर्षी सहा लाख कोटी रुपयांच्या तेलाची गरज भासते. यापैकी एक लाख कोटी रुपयांचे इथेनॉल शेतकऱ्यांनी तयार केले तर देशाचे परकीय चलन वाचेल व शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. शेतकऱ्यांनी या दिशेनेही विचार करावा. पुढच्या काळात नागपूरमधील सर्व शहर बसेस ‘इथेनॉल’ने चालाव्यात असे आपले प्रयत्न आहे, असे गडकरी म्हणाले. जलसंधारणासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक हजार चेक डॅम्स बांधावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. नागपूर जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना सीसीआयच्या अध्यक्षांना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय हा राजकारणाचा नसून तो सामाजिक आहे. त्याच पद्धतीने त्याचा विचार करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा, ‘अॅग्रोव्हिजन’ हा उपक्रम त्यासाठी मदत करणारा ठरेल, असे गडकरी म्हणाले.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सरकारला चिंता : मुनगंटीवारशेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे सरकार चिंतित आहे. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कृषी विद्यापीठांचे विभाजन, जलसंधारणाच्या योजना, सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासोबतच इतरही योजना पुढच्या काळात सरकार राबविणार आहे, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. अर्थमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या योजनांसाठी निधी अपुरा पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘अॅग्रोव्हिजन’ हे पुढच्या काळात देशपातळीवरील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुख्यमंत्र्यांच्या घोषणालोडशेडिंगपासून मुक्ततेसाठी शेतकऱ्यांना पाच लाख सौरपंपांचे वाटप, यातील आत्महत्या अधिक असलेल्या सहा जिल्ह्यांना प्राधान्य४बदलत्या हवामानाची माहिती देण्यासाठी राज्यात मंडळस्तरावर २०६५ स्वयंचलित हवामान केंद्र. टप्प्याटप्प्याने ग्रामपंचायत पातळीवरही देणारपीक विमा योजनेत सुधारणा करून व्यक्तिगत विम्याचा लाभ शेतकऱ्यांना देणारशेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करणारसिंचन क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या धरणांऐवजी लघु बंधाऱ्यांवर भर, प्रकल्प किती सुरू केले यापेक्षा सिंचन क्षमता किती वाढली याला प्राधान्य.राजू शेट्टींनी घेतली २५ मुले दत्तकशेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न सामाजिक आहे. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाची वाताहात होते. अशा वेळी समाजानेही त्यांच्यासाठी मदत करण्यास पुढे येण्याची गरज आहे. ही भावना ठेवूनच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची ५ वी ते १२ वीत असलेली २५ मुले आपण दत्तक घेतली असून त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणार आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी येथे जाहीर केले.इथेनॉलवर चालणाऱ्या बसमधून फिरले नेते‘अॅग्रोव्हिजन’च्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना इथेनॉल तयार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळी इथेनॉलवर धावणाऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. याच बसमध्ये बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतरही नेत्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली.
प्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू
By admin | Updated: December 5, 2014 00:43 IST