नेमके काय चालू आहे : शिवसेना नेतृत्वापुढे पडलाय पेच
अतुल कुलकर्णी - मुंबई
विरोधी पक्षनेता शिवसेनेचाच असेल, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे भाजपाशी चर्चा सुरू ठेवायची; शिवाय ‘या माङया सहनशीलतेला लाचारी समजू नका,’ असेही सांगायचे. सामान्य शिवसैनिकाला नेमके काय चालू आहे, हेच कळेनासे झाले आहे. आपण विरोधात आहोत की सत्ताधारी पक्षाच्या बाजूने आहोत, असा संभ्रम त्यांच्या मनात आहे. निवडून आलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत वाटा हवा आहे, तर कार्यकर्ता असलेल्या शिवसैनिकांना आत्मसन्मान हवा आहे.
भाजपाने ठरवून शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सोबत घ्यायचेच नाही, असा डाव भाजपाने आखला आणि त्यात ते यशस्वी झाले. भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तोडण्याचा निर्णय निवडणुका होण्याआधीच ठरला होता. जागावाटपाची बोलणी हा केवळ फार्स होता. सगळे काही ठरल्यानुसार झाले; पण गणित चुकले ते जागा जिंकण्याचे. किमान 135 जागा येतील आणि उरलेल्या जागांची भरपाई मनसे व अपक्षांकडून करून घेता येईल, असे भाजपाला वाटत होते. पण हे गणित मात्र गडबडले. त्याचबरोबर एकदा का शिवसेनेला सत्तेत वाटा दिला तर भविष्यात कधीही युती तोडता येणार नाही, हे पक्के लक्षात आलेल्या भाजपाने अतिशय चलाखीने आणि शांतपणो पावले टाकली.
दोन राजकीय घटना सोमवार दुपारनंतर घडल्या. शरद पवार यांनी सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय आमदारांच्या सदसद्विवेक बुद्धीवर सोडला आणि युती तुटल्याची घोषणा करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘आगे आगे देखीये होता हैं क्या’ अशी प्रतिक्रिया दिली. युती तुटण्याची घोषणा होताच काही मिनिटांतच आघाडी तुटल्याची घोषणा राष्ट्रवादीने केली होती, हा संदर्भ लक्षात घेतला तर हे सगळे कसे ठरवून चालू होते, हे लक्षात येईल.
या सगळ्यात बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीत तयार झालेले उद्धव ठाकरे मात्र राजकीयदृष्टय़ा कमी पडले. आपल्या सहनशीलतेला लाचारी समजू नका हे सांगावे लागते, यातच सगळे काही आले. बारकाईने सगळा घटनाक्रम पाहिला, तर ज्या ज्यावेळी युतीची बोलणी सकारात्मक दृष्टीने पुढे सरकत होती त्या त्यावेळी खा. संजय राऊत असे काही विधान करायचे की, युतीची बोलणी पुन्हा लटकून जायची. याच राऊत आणि पवार यांच्या संबंधांची चर्चा उघडपणो होत आहे.
भाजपाला स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. आजच्या परिस्थितीत निवडणुका कोणत्याही पक्षाला नको आहेत. त्यामुळे किमान दोन-अडीच वर्षे तरी हे सरकार अल्पमतात असले तरीही तरून जाईल. भाजपासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. शिवसेनेत या सगळ्या गोंधळावरून प्रचंड खदखद आहे. त्याचाच परिपाक म्हणून येत्या काळात काही शिवसेनेनेचे आमदार राजीनामे देतील आणि त्यांना भाजपाच्या तिकिटावर निवडून आणले जाईल. त्या दृष्टीने पडद्याआड हालचाली सुरूही झाल्या आहेत.
शरद पवार यांचे लक्ष्य काँग्रेसला हद्दपार करणो आहे आणि भाजपाचे लक्ष्य शिवसेना आहे. राज्याचे राजकारण करू पाहणा:या शिवसेना नेत्यांना या घडामोडी कशा कळू शकल्या नाहीत, हा सवाल शिवसेना आमदारांना छळत आहे. बाळासाहेब जर आज असते तर ‘कमळाबाई’च्या नावाचा उद्धार करीत त्यांनी या असल्या सत्तेवर लाथ मारली असती.
एकीकडे चर्चा सुरू आहे, असे सांगायचे आणि दुसरीकडे विरोधीपक्षावर हक्क दाखवायचा, हा दुटप्पीपणा शिवसेनेत कधीपासून
सुरू झाला? जे आहे ते रोखठोक तोंडावर सुनावणारा सेनेचा बाणा
गेला तरी कुठे? भाजपा पाठीत खंजीर खूपसत आहे, हे कळूनही म्यानातली तलवार बाहेर का निघत नाही?
राज ठाकरे यांनी हात पुढे
करूनही निवडणुकीआधी दोघे भाऊ कोणामुळे एकत्र येऊ शकले नाहीत? असेच चालू राहिले तर पक्ष वाढवायचा तरी कसा? आणखी पाच वर्षे सत्ता मिळणार नसेल, तर पुढे होणा:या निवडणुकीत तरी ती
कशी मिळणार? या असल्या अनेक प्रश्नांनी शिवसैनिक कमालीचा अस्वस्थ झाला आहे.