ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ ऑगस्ट २०१५ पासून रद्द करण्याची महत्वपूर्ण घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केला.
एलबीटी रद्द करण्यात यावा अशी भावना जनमानसात आहे मात्र एलबीटी रद्द करून व्हॅटमध्ये वाढ केल्यास त्याचा भार राज्यातील सर्व जनतेवर पडेल. त्यामुळे या सर्वाचा सुक्ष्म अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच कच्च्या तेलावरील जकातीपोटी मुंबई महापालिकेला मिळणा-या निधीची भरपाई तेल कंपन्या राज्यातील सर्व जनतेकडून करतात. त्यामुळे त्याचाही पुनर्विचार होण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून यातून तोडगा काढण्यात येईल. मात्र एक ऑगस्टपासून राज्यातील एलबीटी रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुनगंटीवार यांच्या या निर्णयाचे व्यापा-यांनी स्वागत केले आहे. विरोधकांनी मात्र मुनगंटीवार यांच्या अर्थसकंल्पावर टीका केली आहे. हा अर्थसंकल्प जनतेची निराशा करणारा असल्याची टीका माणिकराव ठाकरे यांनी केली. तर मूठभर व्यापा-यांच्या भल्यासाठी राज्यातील सर्वसामान्य जनतेवर करवाढीचा बोजा का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी केला आहे.
तत्पूर्वी राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून सावकारांकडून कर्ज घेतलेल्या २ लाख २३ हजार शेतक-यांना कर्जमुक्त करणार अशी घोषणाही मुनगंटीवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपणा दरम्यान असंख्य तांत्रिक अडचणी येत असल्याने फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाला बिघाडाचे गालबोट लागले. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदीतील शेरोशायरीचा वापर करत विरोधकांना चिमटे काढत अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात केली. राज्यावर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे आमचे ध्येय असून राज्याला सुजलाम - सुफलाम करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतक-यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी १७१ कोटी रुपयांची तरतूद केली असून या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील कर्जबाजारी शेतक-यांचे कर्ज फेडले जाईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. याशिवास आत्महत्या ग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात मोतीराव लहाने कृषी समृद्धी योजना राबवू, यवतमाळमध्ये यशस्वी ठरल्यास ही योजना राज्यभरात राबवणार असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :
> १ ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करणार
> १ एप्रिलपासून प्रयोगवही, चित्रकला वही, आलेख वही, वर्कबुक करमुक्त करणार, कर्करोगावरील काही औषधे करमुक्त करणार.
> एलईडी बल्बवरील कर १२.५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर, जीवनावश्यक वस्तूंवरील करसवलत कायम.
> मसाल्यावर ५ टक्के कर, एकत्रित मसाल्यांनाही ५ टक्के कर लागू करणार.
> १० हजार रुपये मासिक उत्पन्न असणा-या महिलांना प्रॉफेशनल टॅक्स लागू होणार नाही.
> १ एप्रिल २०१६ पासून राज्यात जीएसटी लागू करणार.
> राज्यातील २०६ हुतात्मा स्मारकांचे नुतनीकरण करणार, या स्मारकांमध्ये आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद.
> ९५६ दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन करणार.
> अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक व इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी १०० कोटी
> सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारचे विशेष पाऊल, प्रत्येक जिल्ह्यात सायबरक्राईम लॅब उभारणार. अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये सीसीटीव्ही लावणार.
> राज्यातील मुस्लिम बहुल असलेल्या ४४० गावांसाठी विशेष मदत, भिवंडी, मालेगाव, मिरज येथील विशेष योजना. २५ कोटींची तरतूद
> कमी वजनाच्या व आजारी नवजात अर्भकांचे मृत्यू रोखण्यासाठी ७० नवजात शिशू रुग्णवाहिका सरकार घेणार.
> आयएएस आणि आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे पूर्व परीक्षा पास होतील त्यांच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकार मदत करणार.
> जे. जे. स्कूल ऑफ आर्टसह इतर आर्ट महाविद्यालयांचे आधुनिकीकरण करणार, १० कोटींची तरतूद. औरंगाबादमध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग व अॅग्रीकल्चर संस्था स्थापन करणार.
> राज्यातील मुलींची वसतीगृह बांधण्यासाठी ११२ कोटींची तरतूद
> राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात खेळाडूंसाठी सार्वत्रिक व्यायाम शाळा उपलब्ध करणार, ५० कोटींची तरतूद
> कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे आमच्यासमोरील ध्येय. तरूणांच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना राबवणार. प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार, औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातही कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार, त्यासाठी १६१ कोटी ८४ लाखाची तरतूद.
> महाराष्ट्र राज्य बांबू विकास मंडळ स्थापन करणार.
> महाराष्ट्रातील पर्यटनासाठी चंद्रपूरमधील बल्लारपूरमध्ये वनस्पती उद्यान तर सिंधुदुर्गात सी वर्ल्ड उभारणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील काही ठिकाणी वाय फायची सुविधा देणार.
> राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी ७३ लाखाची तरतूद
> डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त नागपूरमधील कामठी येथे आंबेडकर यांचे स्मारक व प्रशिक्षण केंद्र उभारणार, १० कोटींची तरतूद.
> नागपूरमधील मिहान प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद.
> 'मेक इन महाराष्ट्र' हा नवा उपक्रम सुरू करणार.
> नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती येथील बस स्थानकांचे नुतनीकरण करणार. नूतनीकरण व नव्या एसटी बसेससाठी १४१. ४० कोटींची तरतूद.
> मुंबई मेट्रो-३ साठी १०९कोटी ६० लाखांची तरतूद. पुणे मेट्रोसाठी १७५ कोटीनागपूर मेट्रोसाठी १९८ कोटींची तरतूद.
> मध्यमवर्गीयांसाठी नवीन गृहनिर्माण योजना आणणार, २००२ पर्यंत राज्यात कोणीही घराशिवाय राहणार नाही.
> आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना सुरू. प्रत्येक आमदारांना गाव दत्तक घेऊन विकास करता येणार. आमदार निधीच्या ५० टक्के निधी सरकार देणार.
> वीज निर्मिती प्रकल्पासांठी ५३४ कोटींची तरतूद.
> जलसिंचनासाठी २७७२ कोटींची तरतूद
> द्राक्ष बागांसाठी शेडनेट उपलब्ध करून देण्याची योजना.
> कृषी विकास योजनेसाठी ३३६ कोटी रुपये.
> रस्ते विकासासाठी ३५० कोटी रुपये
> सौर उर्जेवर चालणारे ७५४० कृषीपंप बसवणार, १०३९ कोटींची तरतूद. साखळी सिमेंट बंधा-यासाठी ५०० कोटी रुपये देणार.
> शेतक-यांच्या आत्महत्येने ग्रासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात मोतीराम लहाने कृषीसमृद्धी योजना राबवणार, प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवू व यात यश आल्यास संपूर्ण राज्यात या योजनेचा विस्तार करणार.
> शेतक-यांना सावकाराकडून घेतलेल्या कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील, मराठवाडा व विदर्भातील कर्जबाजारी शेतक-यांची १७१ कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकार फेडणार, या योजनेतून २ लाख २३ हजार शेतक-यांना फायदा मिळणार.
> राज्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी व सरकारी खर्चावर बचत सुचवणा-या अधिकारी व कर्मचा-यांना प्रोत्साहन देणार
> मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे या शहरांमधील एसटी बस स्थानकांचे नुतनीकरण व बसखरेदीसाठी १४१ कोटी रुपयांची तरतूद
> राज्यातील सहा प्रमुख शहरांमध्ये लहान मुलांची शाळेतून ने - आण करण्यासाठी महिला वाहनचालकांना ई टॅक्सीसाठी प्रोत्साहन देणार, यासाठी महिलांना विशेष आर्थिक सहाय्य
> नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी ७३ लाखाची तरतूद
> सौर उर्जेवर चालणारे ७५४० कृषीपंप बसवणार, १०३९ कोटींची तरतूद. साखळी सिमेंट बंधा-यासाठी ५०० कोटी रुपये देणार.
> जलसिंचनासाठी २७७२ कोटींची तरतूद.
> आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना सुरू. प्रत्येक आमदारांना गाव दत्तक घेऊन विकास करता येणार. आमदार निधीच्या ५० टक्के निधी सरकार देणार.