अकोला : सततच्या हवामान बदलाचा परिणाम खरीप पिकावर होत असून, अनेक प्रकारच्या कीडींनी या पिकांवर हल्ला केल्याने शेतकर्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. सोयाबीन पिकावर आलेल्या भुरक्या सोंड्यांचे व्यवस्थापन करताना त्रस्त झालेल्या शेतकर्यापुढे, तंबाखुची पाने खाणार्या अळीचेही संकट उभे राहू पाहात आहे. कापूस या पिकावरही कोकडा आला आहे. यंदा दोन महिने उशिरा पाऊस सुरू झाला असून, भरिस भर वातावरणात सतत बदल होत आहेत. प्रखर तापमान , ढगाळ वातावरण, कधी कमी तर कधी जास्त पाऊस असे प्रतिकुल वातावरण आहे. याचा फटका खरीप पिकांना बसत असून, अनेक पिकांवर मुख्यत्वे कापूस आणि सोयाबीन पिकावर वेगवेगळ्य़ा किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २९ ऑगस्टपासून अधून- मधून पाऊस सुरू झाला आहे.त्यामुळे शेताचा फेरफटका मारणे किंवा पिकांचे सर्वेक्षण करणे शेतकर्यांना कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अनेक भागात शेतांमध्ये पाणी साचले आहे. ते शेताबाहेर काढणेही अशावेळी शक्य होत नसल्याने पिके पिवळी तर पडतच आहेत, शिवाय अशा भागात किडींचा जोर वाढला आहे. पश्चिम विदर्भात खरीप पिकांवर भुरके सोंड्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. ही बहुभक्षी कीड असून, या किडीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार या किडीचे व्यवस्थापन करावे.
विदर्भात खरीप पिकांवर किडींचा हल्ला !
By admin | Updated: September 9, 2014 04:54 IST