अहमदनगर : नितीन आगे हत्या प्रकरण हे जातीय वादातून झालेले नाही़ सामाजिक जाणिवेच्या अभावातून ही घटना घडली आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आगे कुटुंबीयांची भेट घेतली़ त्यानंतर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पाटील म्हणाले, नितीन आगे याची हत्या २८ एप्रिलला झाली़ ही हत्या मराठा-दलित वादातून झाल्याचे चित्र रंगविण्यात येत आहे़ आम्ही आगे कुटुंब, खर्डा गावचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक रहिवासी व पोलीस उपविभागीय अधिकारी धिरज पाटील, पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली़ या चर्चेतून ही हत्या जातीय नसल्याचे स्पष्ट होत आहे़ पौंगाडावस्थेतील आकर्षण आणि चुकीच्या पारंपरिक संकल्पनांचा नितीन आगे बळी ठरला आहे़ योग्य वयात तरुणांवर संस्कार करणे आवश्यक आहे़ शिक्षक, पालक व समाजाने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे़ केवळ सामाजिक जाणिवेच्या अभावातूनच ही घटना घडली आहे़ सामाजिक जाणिव जागृतीसाठी नगरमध्ये लवकरच अंनिसतर्फे परिषद घेण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले़ अहमदनगर जिल्ात मागील दोन वर्षांच्या काळात सोनई येथील हत्याकांडसारख्या हिंसक घटना घडल्या आहेत. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी, माध्यमे या पातळीवर अधिक जबाबदारपणाची भूमिका निभावणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
खर्डा हत्याप्रकरण सामाजिक जाणिवेच्या अभावातून
By admin | Updated: May 9, 2014 21:44 IST