ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २ - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाआधी भेट दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माडबन, जैतापूर, मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष समितीने दिला आहे. संघर्ष समितीने प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे म्हणाले की, प्रकल्पाला सातत्याने विरोध करूनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून जैतापूर प्रकल्पावर मोर्चा काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.त्याआधी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आझाद मैदानातील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जैतापूर येथील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी या ठिकाणी हजेरी लावली.दरम्यान, संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पर्यावरण राज्यमंत्री रामदास कदम यांची भेट घेतली. त्यात २६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकल्पाची पर्यावरणीय मुदत संपल्याचे संघर्ष समितीने कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. सरकार परस्पर या प्रकल्पाला मुदतवाढ देत असून, कायद्यानुसार प्रकल्पाचा अहवाल पुन्हा तयार करून जनसुनावणी घेणे आवश्यक असल्याचेही संघर्ष समितीने स्पष्ट केले. यावर कदम यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे. मात्र जावडेकर यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे.
गणेशोत्सवाआधी जैतापूर पेटणार - संघर्ष समितीचा इशारा
By admin | Updated: August 2, 2016 23:08 IST