‘अध्यात्म व विज्ञान’ विषयावर व्याख्यान : गुर्जलवार यांचे प्रतिपादननागपूर : विश्वातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जी गोष्ट बदलत असते, त्याला आपण सत्य म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण विश्वात जे काही पाहतो. ते सत्य नसून, त्याच्या पाठीमागे वेगळेच काही विश्व आहे, असे प्रतिपादन डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी केले. सी. पी. अॅण्ड बेरार शिक्षण संस्थेच्यावतीने शंकरराव पाध्ये स्मृतिप्रीत्यर्थ ‘अध्यात्म व विज्ञान’ या विषयावर गुरुवारी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाल येथील सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुनील देशपांडे होते. अतिथी म्हणून सी. पी. अॅण्ड बेरार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दत्तात्रेय बाराहाते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्नल देशपांडे यांच्या हस्ते डॉ. गुर्जलवार यांचा सत्कार करण्यात आला. सामान्य माणूस विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी वेगवेगळ््या समजत असला, तरी विज्ञान व अध्यात्म हातात हात घालून कसा प्रवास करीत आहे, हे डॉ. गुर्जलवार यांनी आपल्या व्याख्यानातून अतिशय सहज व सोप्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, जेथे विज्ञान संपते, तेथे भारतीय अध्यात्माचे दर्शन घडते. सध्या आपण एका छोट्याशा खिडकीतून विश्व पाहत आहोत. त्यामुळे आपण जे पाहतो, ते काहीही सत्य नाही. आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट ही असत्य आहे. त्यामुळे भारतीयांनी ते सत्य उलगडून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सर्वांना सत्याची प्रचिती यावी लागेल. एखाद्या गोष्टीचे ध्यान केले की, माणूस हा साधनेकडे जातो, आणि त्यातून त्याला ज्ञानप्राप्ती होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले. ं(प्रतिनिधी)
दिसते ते सर्व असत्य!
By admin | Updated: September 12, 2014 00:48 IST