गोपाल लाजुरकर, गडचिरोलीबालपणीच मातृ-पितृछत्र हरविलेल्या देविका काटिंगल या विद्यार्थिनीने नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यात मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत्त करून नक्षली भीतीच्या सावटाखाली जीवन न जगता सुसंस्कृत होण्याचा संदेश दिला. देविकाने परिसरातील गावांमधील मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. या कार्याची दखल घेऊन युनिसेफ व सह्याद्री वाहिनीच्या वतीने नवज्योती पुरस्कार देऊन तिला सन्मानित करण्यात आले. छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कुलभट्टी गावात देविका काटिंगल ही कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होती. देविकाने कसेबसे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. त्यानंतर आठवीपासून धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शिक्षण घेण्यास सुरुवात केली. देविकाच्या वडिलांचे मूळ गाव छत्तीसगड राज्यातील. जन्म धानोरा तालुक्याच्या कुलभट्टी येथे आजोळी झाला. सात वर्षांची असताना तिच्या वडिलांनी आईला मारहाण करून घराबाहेर काढले. अल्पावधीतच वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर देविकाचा सांभाळ देविकाच्या आजी-आजोबांनी केला. याच काळात देविकाने नक्षलग्रस्त भागातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला़ मुलींचे शिक्षण, स्त्रियांवरील अत्याचारविरोधी देविकाची कळकळ लक्षात घेऊन युनिसेफ व सह्याद्री वाहिनीतर्फे २९ नोव्हेंबरला मुंबई येथे नवज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या हस्ते देविकासह राज्यातील नऊ विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा शिंपी यांचे देविकाला मार्गदर्शन मिळाले. जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सीईओ संपदा मेहता, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा समन्वयक लता चौधरी यांच्या हस्ते देविका काटिंगल हिला पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
नक्षलग्रस्त भागातील ‘मलाला’ची आंतरराष्ट्रीय दखल
By admin | Updated: December 29, 2014 04:59 IST