पुणे : केंद्रीय पद्धतीने देण्यात येणाऱ्या अकरावीच्या कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची माहिती देणाऱ्या पुस्तिकांच्या छपाईचे काम वेगाने सुरू आहे. येत्या ६ मेपासून या पुस्तिकांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व विभागीय उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिली.अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेचे काम केंद्रीय प्रवेश समितीमार्फत केले जात आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी समितीच्या वतीने सहकारनगर येथील मुक्तांगण आवारात बैठक आयोजित करण्यात आली होती. सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला क्षेत्रप्रमुख, केंद्रप्रमुख, संपर्कप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल)च्या अधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘भाग एक’मध्ये आॅनलाइन प्रवेश अर्ज कसा भरला जातो, याचे प्रात्यक्षिक दाखविले. अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी सुमारे ३०० हून जास्त कनिष्ठ महाविद्यालयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. या महाविद्यालयांमधील विविध विद्या शाखांसाठी ही केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. व्यवस्थापन कोट्यासह अल्पसंख्याक, शाळाअंतर्गत असे सर्व प्रवेश आॅनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही महाविद्यालयाला एकही प्रवेश आॅफलाइन पद्धतीने करता येणार नाही. प्रवेशित सर्व कोट्यांची यादी संबंधित महाविद्यालयांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे. या बैठकीबाबत राऊत म्हणाल्या, एमकेसीएलसोबत केंद्रीय प्रवेश समितीचा करार झाला आहे. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी अत्यावश्यक असलेला ‘भाग एक’ प्रवेश अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आॅनलाइन प्रवेश माहिती पुस्तिका घेणे बंधनकारक आहे. या पुस्तिकेची किंमत शंभर रुपये असणार आहे. सुमारे १ लाख १० हजार प्रवेश माहिती पुस्तिकांची सध्या छपाई सुरू आहे. या पुस्तिकांचे ६ मेपासून वितरण सुरू करण्यात येणार आहे.>पालक व विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर उद्बोधन वर्गआॅनलाइन प्रवेशाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर पालक-विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून उद्बोधन वर्ग घेतले जाणार आहेत. यासंदर्भात सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठकही घेतली जाणार आहे. दहावी अनुत्तीर्ण झालेल्यांची पुनर्परीक्षा जुलैमध्ये आहे. तीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही अकरावी प्रवेशप्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातील, अशी माहिती रामचंद्र जाधव यांनी दिली.
माहिती पुस्तिका शुक्रवारपासून मिळणार
By admin | Updated: April 30, 2016 01:46 IST