नंदकुमार टेणी, ठाणेजिल्ह्यातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने व जंगलांतील संपुष्टात येत असलेले भक्ष्य, जानेवारीतच आटलेले पाणवठे व बिबळ्यांची वाढलेली संख्या यामुळे बिबळे अपघातात मरण पावण्याचे तसेच मनुष्यवस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील सर्वाधिक बिबटे हे ठाणे जिल्ह्यातील जंगलांत आहेत. ऊसतोडीचा हंगाम संपला की, प्रजोत्पादनासाठी नगर, पुणे, मराठवाडा, सोलापूर येथील उसात दडलेले बरेचसे बिबटे या जंगलात येतात. जंगलातील प्रजोत्पादनामुळे देखील त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत या जंगल क्षेत्रातील भक्ष्य अत्यंत घटले आहे. तसेच या जंगलात निसर्गनिर्मित आणि वनखात्याने निर्माण केलेले पाणवठेदेखील आटल्यामुळे बिबळ्यांना जंगलाबाहेर येणे भाग पडत आहे. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधार्थ बिबटे महामार्गांच्या जवळ येतात. वाहनांचे कर्कश प्रेशर हॉर्न त्यांना दचकावतात व ते बिथरतात. वाहनांना लावलेल्या प्रखर एलईडी डीपरमुळे त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी येते आणि ते चवताळतात. त्यामुळे अनेकदा समोर वाहन दिसत असतानाही ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि जखमी होतात, असा वनखात्याचा निष्कर्ष आहे. एकीकडे नैसर्गिकरीत्या बिबट्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांचे विषबाधा वा वाहनांच्या धडकेमुळे मृत्यू होऊ लागले आहेत. याबाबत, वनखात्याने तातडीने उपाय करण्याची गरज प्राणिमित्रांनी व्यक्त केली आहे.