- जयेश शिरसाट
ढोबळेंनी पोलीस कसा असावा हा आदर्श घालून दिला होता. शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांनाही असाच धडाकेबाज, कोणाच्याही दबावाखाली न येता किंवा आमिषाला बळी न पडता फक्त कर्तव्य बजावणारा पोलीस हवाय. पण भविष्यात ढोबळेंसारखा दुसरा अधिकारी होईल, अशी परिस्थिती मुंबई पोलीस दलात सध्या नाही. ढोबळेंच्या निवृत्तीला आठवडा झालाय. ३९ वर्षांनंतर ढोबळे सर्वसामान्य नागरिक झालेत. गेल्या ७ दिवसांत पुण्याच्या मंचर गावातल्या शेतीत ढोबळे राबले. गेल्या आठवड्यात एसीपी वसंत ढोबळे पोलीस दलातून निवृत्त झाले आणि मुंबईत अवैधपणे नाइटलाइफ सुरू ठेवणाऱ्या प्रत्येकानेच सुटकेचा नि:श्वास सोडला. पण निवृत्त झाल्यानंतरही स्वस्थ बसायचं नाही, असं ढोबळेंनी ठरवलंय. अजून बरंच काम बाकी होतं. खूप काही करता आलं असतं. आता रिटायर्ड झाल्यानंतर राहून गेलेली कामं पूर्ण करेन म्हणतो, ढोबळे सांगत होते. म्हणजे नेमकं काय करणारेत ढोबळे? पुन्हा हातात हॉकी स्टीक घेऊन बारवाल्यांच्या मागे लागणारेत की ‘धंदा’ चालणारी ब्युटी पार्लर्स बंद पाडणारेत? नाही. मुंबईतून बेपत्ता झालेल्या १० हजारांहून जास्त लहानथोरांचा शोध लावण्याचा संकल्प मी सोडलाय. गावाकडल्या शेतीकडेही लक्ष देणार आहे, ढोबळे सांगतात.वाटलं नव्हतं मी इतक्या सहज सेवानिवृत्त होईन. अभिमानाने निवृत्त झालो, याचा आनंद नाही व्यक्त करू शकत. मागे वळून बघतो तेव्हा ३९ वर्षांच्या कारकिर्दीतला प्रत्येक चढ-उतार अगदी काल-परवा घडल्यासारखा वाटतो. आय विल डेफीनेटली मिस खाकी. खाकीचा दरारा, अधिकार... वर्दीत जिवंतपणाची जाणीव होत होती, ढोबळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ढोबळेंची कारकिर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली. सर्वांत लक्षात राहिला तो त्यांचा समाजसेवा शाखेतला कार्यकाळ. २०१३मध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी समाजसेवा शाखेचा चार्ज ढोबळेंकडे दिला. पटनायक स्वत: आक्रमक असल्याने त्यांनी ढोबळेंना मोकळीक दिली. नियम धाब्यावर बसवणारे डिस्कोथेक, पब, नाइटक्लब, डान्सबार, लाऊंज, ब्युटीपार्लर, स्पा, कुंटणखाने, हुक्का पार्लर, मटक्याचे अड्डे, जुगाराचे क्लब, लॉटरी सेंटर.. अगदी रस्त्यावर लागणाऱ्या चायनीज, बुरजीपावच्या गाड्या ढोबळेंनी रडारवर घेतल्या. मालक कोणीही का असेना, त्याची ओळख कितीही का असेना, नियम तोडल्याची माहिती ढोबळेंपर्यंत पोचली की संपलंच. अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात ढोबळेंनी शहरात एकूण ५५० धाडी घातल्या. वेश्याव्यवसायात ओढल्या गेलेल्या तेराशेहून जास्त तरुणींना सोडवलं. ४०० बालमजुरांची सुटका केली आणि जवळपास ६ हजार आरोपींना गजाआड केलं. त्या काळात मुंबईचा महापौर कोण, स्वत:चा नगरसेवक, आमदार कोण किंवा पोलीस ठाण्याचा वरिष्ठ निरीक्षक कोण हे कदाचित सांगताना एखाद्याची त..त.. प..प.. होईल. पण ढोबळे कोण हे प्रत्येकाला ठाऊक होतं. डान्सबारमधली ढोबळेंची ‘एन्ट्री’च चर्चेचा विषय होती. अनेक बारवाल्यांच्या चर्चेतून पुढे आलेल्या माहितीप्रमाणे, ढोबळे बारमध्ये आले की मॅनेजर, कॅशिअरपैकी कोणाला तरी कानाखाली बसायचीच. भिंत अन् भिंत तपासल्याखेरीज ढोबळे आणि टीम बारबाहेर पडत नसे. हे नुकसान बारवाल्यांना भारी पडू लागलं. काही दिवसांतच ढोबळेंची दहशत सर्वत्र पसरली. त्यामुळे सराईत खबऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकांकडूनही आपापल्या वस्तीत सुरू असलेल्या अवैध, नियमबाह्य धंद्यांची माहिती ढोबळेंपर्यंत पोहोचू लागली. मिळालेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करून ढोबळे कारवाई करू लागले. ढोबळेंच्या दहशतीमुळे पहाटेपर्यंत चालणारे पब, डिस्कोथेक वेळेत बंद होऊ लागले. नाइटलाइफला आपोआपच खीळ बसली. आरोप, तक्रारी वाढू लागल्या. पण ढोबळेंची आक्रमकता कमी होण्याऐवजी आणखी वाढली. एकीकडे त्यांच्या बदलीसाठी दबाव येऊ लागला; तर दुसरीकडे ढोबळेंवर नजर ठेवण्यात आली. संध्याकाळी पोलीस आयुक्तालयातून ढोबळेंची गाडी मुंबईच्या कोणत्या भागात जाते याचा पाठलाग करणारे अंदाज घेत आणि त्या त्या उपनगरातल्या बारवाल्यांना, पबवाल्यांना सतर्क करत. यावर ढोबळे सांगतात, दबाव कधी जाणवलाच नाही. कारण मी अयोग्य काहीच केलं नव्हतं. तरुण पिढी डोळ्यांसमोर वाया जात होती. आयुक्तांच्या स्पष्ट सूचना होत्या. त्या मी पाळत होतो इतकंच. पुढे ढोबळेंचीही बदली वाकोला विभागात करण्यात आली. समाजसेवा शाखेत असताना अख्ख्या शहराची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र वाकोल्यात आल्यानंतर त्यांची हद्द फक्त दोन पोलीस ठाण्यांपर्यंत सीमित झाली. त्यातही त्यांनी अवैध फेरीवाले रडारवर घेतले. मिसिंग पर्सन्स ब्युरो ही त्यांची अखेरची नेमणूक. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ते या विभागात आले. तेव्हा शहरातून बेपत्ता, अपहृत झालेल्यांची संख्या १७ हजारांवर होती. हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक नेमून हरविलेल्यांचा शोध घेण्याचे आदेश काढले. अवघ्या ६ महिन्यांत ७ हजारांहून जास्त हरविलेल्यांचा शोध लागला. या योजनेत ढोबळेंचा सिंहाचा वाटा होता.ऐन भरात असताना बारवाल्यांनी आमिषे दिली नाहीत का, या प्रश्नावर ढोबळे सांगतात. मला कोण आमिष देणार आणि काय देणार? पैसे... महागड्या हॉटेलात ड्रिंक - जेवण किंवा बाई... सुरुवातीपासून माझ्या गरजा कमी होत्या. मला जो पगार मिळत होता त्यातच मी समाधानी होतो. खाकी वर्दी होती, गाडी होती. न्यायालयात जाताना पांढरा शर्ट, काळी पँट ठरलेली. जे सर्वसामान्यांना घाबरवतात त्यांना घाबरवलं याचं समाधान मला पोलीस दलातल्या नोकरीने दिलं.