मुंबई - ठाणे ते डोंबिवली असा जलद लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या तीन ते चार दिवसांत दिलासा मिळणार आहे. दिवाजवळील असणाऱ्या पारसिक बोगद्याजवळील लोकलसाठी असणारी वेगमर्यादा हटणार आहे. त्यामुळे लोकलचा वेग पुन्हा वाढण्यास मदत मिळणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. दिवा पारसिक बोगद्यात वरच्या भागातून पाणी पडतानाच अन्य काही तांत्रिक कामांसाठी लोकल फेऱ्यांसाठी वेगमर्यादा देण्यात आली होती. पारसिक बोगद्याजवळील डाऊन मार्गावर सध्या ताशी ३0 किमी वेग मर्यादा लोकलसाठी आखून देतानाच अप मार्गावरही हीच वेगमर्यादा आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली या दरम्यानच्या जलद लोकल प्रवासाला जवळपास २५ मिनिटांचा वेळ लागत होता. गेली चार वर्षे वेगमर्यादा असल्याने १४ मिनिटांच्या प्रवासाला आणखी ११ मिनिटे अधिक लागत असल्याने प्रवाशांचे संपूर्ण वेळापत्रकच बिघडत होते. मात्र आता मध्य रेल्वेने वेगमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डाऊन मार्गावरील वेग आणखी ताशी ५0 किमीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे ते डोंबिवली या दरम्यान जलद लोकलचा वेग हा ताशी ८0 किमी एवढा जाऊ शकतो आणि लोकल या पुन्हा वेळेत धावू शकतात, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
जलद लोकलचा वेग वाढण्यास मिळणार मदत
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST