सातारा : आयुष्यात कधीही हार मानू नये. परिस्थितीशी दोन हात करून अडचणींकडे ‘चॅलेंज’ म्हणून बघितले की यश नक्कीच तुमच्या पदरात पडते, असे प्रतिपादन आदिवासींसाठी काम करणारे व समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे यांनी येथे केले. दरम्यान, कोल्हे दाम्पत्याच्या समाजपरिवर्तनाच्या कहाणीला सातारकरांनी सलाम करीत सुमारे सव्वा लाखाची उत्स्फूर्त मदतही केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि जनता सहकारी बँकच्या वतीने शाहूकला मंदिर येथे आयोजित डॉ. कोल्हे दाम्पत्याच्या मुलाखतवजा कार्यक्रमात ते बोलत होते. अॅड. मुकुंद सारडा, जनता बँकेचे अध्यक्ष आनंदराव कणसे, उपाध्यक्ष अतुल जाधव, किशोर बेडकिहाळ, टी.आर. गारळे, नगराध्यक्ष सचिन सारस, विनोद कुलकर्णी, डॉ. सचिन जाधव उपस्थित होते. डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, आदिवासी समाजाने आम्हाला शेती करण्याचे चॅलेंज दिले. आम्ही ते स्वीकारले आणि अकोला येथील कृषी विद्यापीठातून माहिती घेत पडीक जमिनीतून साडेबावीस क्विंंटल सोयाबीनचे उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. आता तेही शेतीमध्ये प्रयोग करत आहेत. हे उत्पादन २५ वर्षांपूर्वी आम्ही घेतले. त्यानंतर आता महाराष्ट्रात इतरत्र सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्या परिसरातील लोकांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती आहे. जमीन, पाणी, मनुष्यबळ आहे. परंतु वीज नाही जर शासनाने वीजपुरवठा केला तर हा परिसर समृध्द होऊ शकतो. शासनाकडून वीज मिळवणे हे आमच्यासमोरील आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. स्मिता कोल्हे यांनी परिसरातील प्रश्न कसे सोडवले त्याबाबत सांगितले. त्यानंतर कुपोषणाचा विषय समोर आला. शासन दरबारी अर्ज, विनंत्या केल्या परंतु जास्त उपयोग झाला नाही. त्यावर मी संशोधन केले. बीबीसीने ते उजेडात आणल्यानंतर कुपोषण जगभरात पोहचले. याठिकाणी कुपोषण, बालमृत्यू याचं प्रमाणही खूप होते. इतर ठिकाणी १००० मुलांमधील ८ किंंवा ९ मुलं दगावत असतील तर तेच प्रमाण या भागात २०० होते. पण आता हे प्रमाण ६० वर आलेलं आहे. ही काही आनंदाची बाब नाही, हे प्रमाण दहा पर्यंत कसे येईल यासाठी प्रयत्न आहेत.स्वत:च्या मुलांच्या जन्माचा प्रसंग त्यांनी सांगितला तेव्हा सातारकर हेलावून गेले. तुमच्या कार्याची शासनाने दखल घेतली का या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या, शासनापेक्षा सामाजिक संस्था आणि समाजाने दखल घेतली हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. कोणत्याही पुरस्कारासाठी अर्ज करावा लागतो परंतु आम्ही अर्ज करणार नसल्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प लोक आधारित चालावा अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगताच टाळयाचा कडकडाट झाला. शाहुपुरी शाखेचे कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) अपंग दिनाच्या आदल्यादिवशी गौरवडॉ.कोल्हे दाम्पत्य हे समाजपरिवर्तनाची कहाणी सांगत असताना तिथे मूळचे अतित येथील असलेले परंतु सध्या साता-यात राहणारे जाधव दाम्पत्य मुलांसह आले होते. डॉ. एम.आर. जाधव यांची पत्नी अंध आहे. अनुभव कथन झाल्यानंतर त्यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांना मी अंध आहे मला समाजात मान नाही असे असूनही डॉ. जाधव यांनी माझ्याशी लग्न केल्याचे सांगितले. त्यावेळेस डॉ.कोल्हे यांनी जाधव दाम्पत्याला शुभेच्छा देत तुम्ही आदर्श जोडपे असल्याचा गौरव केला. तुम्हाला भेटून आनंद झाल्याचे सांगितले. त्यानंतर उपस्थित सभागृहाने जोडप्याला उभे राहून टाळयाचा कडकडाट करत त्याचा गौरव केला. त्यामुळे जागितक अपंग दिन ३ डिसेंबरला असला तरी त्यापूर्वीच या दामप्त्याचा गौरव करत सातारकरांनी अपंग दिन साजरा केला. दररोज ४० किलोमीटर चालावे लागेल, दुसऱ्यासाठी भिक मागावी लागेल, ४०० रुपयात घर चालवावे लागेल, अशा अटी लग्नापुर्वी मला घालण्यात आल्या होत्या. त्यांच्या अटींना मान्य करून २ डिसेंबर १९८८ ला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा निर्णय घेतला आणि आज २६ वर्षे झाली वाटचाल सुरू आहे .-डॉ. स्मिता कोल्हे
कोल्हे दाम्पत्याच्या कार्याला सलाम !
By admin | Updated: December 4, 2014 23:48 IST