वसंत भोईर,
वाडा- तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद हे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने तेथे असलेल्या एका डॉक्टरलाच सध्या दिवसरात्र काम करावे लागते. तसेच ग्रामीण रुणालयातही हीच परिस्थिती आहे. रिक्त पदांमुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असल्याने त्यांच्यावरच आजारी पडण्याची वेळ ओढावली आहे.वाडा तालुक्यात एक ग्रामीण रुग्णालय, चार प्राथमिक आरोग्य केंद्रे, तीन पथक तर ३८ आरोग्यउपकेंद्रे कार्यरत आहेत. सद्यस्थितीत आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी (४) महिला सुपरवायझर (१) आरोग्य सेविका (१) आरोग्य सेवक (३) आरोग्य सहायक ( १) अशी जि.प. विभागात तर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक (१) वैद्यकीय अधिकारी (१) स्त्री रोग तज्ञ (१) भुल तज्ञ (१)अशी पदे रिक्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत असून त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे आदिवासी व गोरगरीब रूग्णांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो. परळी हे वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राच्या अखत्यारित सुमारे ५३ गावे येत असून ६५ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. येथे दररोज १०० ते १५० आंतररुग्ण तपासणी साठी येतात. त्याच्यावर उपचार केले जातात. या आरोग्य केंद्रापासून २४ किलोमीटर वाडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. हा भाग डोंगराळ आणि अतिदुर्गम असल्याने येथे सर्पदंश, विंचू दंश, अशा घटना नेहमीच घडत असतात. वेळीच उपचार न मिळाल्यास रूग्णांचा मृत्यू होतो, असे असतानाही गेल्या वर्षभरापासून येथे एकच डॉक्टर कार्यरत आहेत. रात्र दिवस त्यांना काम करावे लागते. कधी तालुक्याच्या ठिकाणी मिटींगला आल्यास तेथे कोणी वैद्यकीय अधिकारी नसतो. पर्यायाने आरोग्य सेविकांनाच उपचार करावे लागतात. एखादा गंभीर रूग्ण आल्यास त्याची अवस्था बिकट होते. या आरोग्य केंद्रात महिन्याकाठी १५ ते २० प्रसूती होत असतात. गुंतागुतीची प्रसूती असेल तर तिला ग्रामीण रुग्णालयात नंतर ठाणे व मुंबई येथे न्यावे लागते. गोऱ्हे, खानिवली व कुडूस या आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. एकाच डॉक्टरला येथे काम करावे लागत आहे. कुडूस येथे सद्यस्थितीत एकही डॉक्टर नसल्याने निबंवली पथकाचे डॉ भस्मे हेच येथील कारभार पाहून आपल्या निंबवली पथकाचाही कारभार पाहत आहेत. कुडूस हे औद्योगिक दृष्टया गजबजलेले शहर असल्याने येथे रूग्णांची मोठी गर्दी असते. शिवाय महामार्गावरील छोट्या मोठ्या अपघातातील जखमींची भर त्यात पडत असते. कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन लवकर करून ते जनतेसाठी खुले करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या केंद्राच्या जुन्या कौलारू चाळीत बाह्य रूग्ण, आंतररुग्ण, रक्त तपासणी औषध ठेवण्याची खोली, वैद्यकीय अधिकारी कार्यालय, प्रसूती गृह, हे सर्व एकाच जागी असल्याने ही जागा अत्यंत अपुरी पडत आहे. अपुऱ्या जागेमुळे रूग्णांचे हाल होत असल्याने इमारतीचे उद्घाटन लवकर करावे अशी मागणी केली जात आहे. >आरोग्य उपकेंद्रे शो पुरतीच, उघडतात फक्त ४ तासवाडा तालुक्यातील ३८ आरोग्य उपकेंद्रे फक्त तीन ते चार तास उघडली जातात. त्यानंतर बंदच असतात. शासनाच्या नियमानुसार या केंद्रात आरोग्य सेविकेने कायमस्वरूपी राहणे असा नियम आहे. मात्र तालुक्यातील बहुतांशी उपआरोग्य केंद्रात कोणीही राहत नाही. शासनाने सेविकेला येथेच राहता यावे म्हणुन आरोग्य उप केंद्राच्या इमारतीत स्वतंत्र सुविधा केलेली आहे. मात्र ही आरोग्य उपकेंद्रे फक्त शो पिस बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाडा ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय अधिक्षकाांची गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाली आहे. त्यामुळे हे पद रिक्त असून येथे डॉ प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत असून त्यांनाच रात्र दिवस काम करावे लागते. तसेच या रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळे गोरगरीब रूग्णांची गैरसोय होत आहे. गोऱ्हे व परळी येथील कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाची दुरवस्था झाली आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली आहेत. गोऱ्हे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला गळतीचे दुखणे आहे. मात्र बांधकाम प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. >परळी येथे ग्रामीण रु ग्णालय हवेपरळी हे तालुक्यातील अतिदुर्गम भागात येत असून हे गाव वाड्यापासून २४ कि.मी. अंतरावर आहे. तर त्र्यंबकेश्वर अंतरही जास्त आहे. शासनाच्या नियमानुसार अतिदुर्गम व डोंगराळ भागात १५ कि.मी. अंतरावर ग्रामीण रुग्णालय असावे असा नियम आहे. या नियमा प्रमाणे व आदिवासी जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी म्हणून येथे शासनाने ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करावी. - वैभव पालवे , सामाजिक कार्यकर्तेरिक्त पदांमुळे रूग्णांची गैरसोयवाडा तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सध्या कुचकामी ठरत आहे. अनेक पदे रिक्त असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात पैसे देऊन जावे लागते. पर्यायाने आदिवासी व गोरगरीब रूग्णांना शासनाच्या या आरोग्य यंत्रणेचा फायदा होत नाही. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरावीत. - रूपेश मोकाशी, सामाजिक कार्यकर्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद चव्हाण यांच्याशी वारंवार संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.