ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - दि. ८ जुलै २०१५ ते दि. ८ जुलै २०१६ हे संपूर्ण वर्ष ख्यातनाम साहित्यिक, कादंबरीकर, दुर्गप्रेमी साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचे जन्मशताब्दीवर्ष म्हणून साजर झालं. नुकताच या जन्मशताब्दी सोहळ्याचा शानदार सांगता समारंभ पुण्यात पार पडला.
या संपूर्ण वर्षभरात स्वर्गवासी अप्पांच्या साहित्याशी निगडीत असे अनेक कार्यक्रम देश-विदेशात पार पडले. व्याख्याने, त्यांच्या कादंब-यांची अभिवाचने, प्रदर्शने, आकाशवाणीवरचा एक विशेष कार्यक्रम , अप्पांच्या साहित्यातील व्यक्तिरेखांचे सादरीकरण, सांगितीक चर्चासत्र अशा अनेक कार्यक्रमांनी हे वर्ष गजबजून गेलं.
नुकतंच पुण्यात या जन्मशताब्दी वर्षाचा देखणा सांगता-समारंभ पार पडला. देव कुटुंबियांच्या वतीने दिला जाणारा साहित्याशी निगडीत मृण्मयी पुरस्कार या समारंभात विजया मेहता यांच्या हस्ते सिद्धहस्त नाट्यलेखक महेश एलकुंचवार यांना देण्यात आला. तसेच सामाजिक कार्याशी निगडीत असलेला नीरा-गोपाल पुरस्कार नलिनी मिश्रा यांना देण्यात आला. यावर्षीपासून ताज्या दमाच्या लेखकांना प्रोत्साहनपर गोनीदा पुरस्कार या नवोदित लेखकाला देण्यात आला.
जन्मशताब्दीवर्षा निमित्ताने एक वेगळा उपक्रम दिनांक ४ मे रोजी करण्यात आला. स्वर्गवासी अप्पांनी नर्मदा परिक्रमा केलेली असल्याने नर्मदेवी संबधित 'नर्मदे हर हर' हा एक कार्यक्रम पुण्यात पार पडला. स्वर्गवासी अप्पांचे साहित्या नव्या पिढीला उपलब्ध व्हावे म्हणून मृण्मयी प्रकाशनाने अप्पांची स्वरगाथा , दुर्गभ्रमण गाथा, बिंदूंची कथा, मोगरा फुलला, तुका आकाशाएवढा अशा अनेक पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. एकूणच या वर्षात अप्पांच्या साहित्याचा जागर त्यांच्या स्वकीयांनी, दुर्गप्रेमींनी व रसिक वाचकांनी मांडला.
परवाच्या सांगता समारंभात महेश एलकुंचवारांसारख्या सिद्धहस्त लेखकाने स्व.अप्पांच्या साहित्याबाबत बोलताना उद्गार काढले ते तर नव्या पिढीच्या नव्या लेखकांना मार्गदर्शन करणारे होतेच पण त्या जोडीला त्या लेखकांच्या डोळ्यात अंजन घालणारेही होते. ते म्हणाले, आमची पिढी अप्पांच्या लेखनामुळे लखनसमृद्ध झाली. इतकी मिताक्षरी पण अर्थगर्भ भाषा मी फार थोड्या ठिकाणी पाहिली. त्यांचं अनुभवाला जाऊन थेट भिडणं नव्या लेखकांना झेपणारं नव्हतं. ते अनुभव पेलायची ताकद नसल्याने ते लेखनच नाकारायची, भावनिक म्हणून हेटाळणी करण्याची सुरूवात झाली. आणि या हेटाळणीला स्पिरीट ऑफ इर्ररिलेटिव्हिटी (spirit of irrelativity) म्हणून आम्हीच मुलामा देऊन त्याचे समर्थन केले. खरतर जुन्या परंपरा व आधुनिक विचारा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंपरेत घट्ट पाय रोवल्याशिवाय आधुनिक विचार आत्मसात करताच येत नाहीत.
स्व. अप्पांच्या ' अजून नाही जागे गोकूळ' या कादंबरीची उदाहरणे देऊन महेश एलकुंचवार म्हणाले, ' असं एखादं नाकारलेलं, झिकारलेलं, त्याज्य, कुरूप व्यक्तिमत्व घेऊन त्या तुलनेच्या व्यक्तिमत्वावर आष्टसात्विक भाव निर्माण करणारे लिखाण फक्त दांडेकरच करू शकतात. त्यांची ती आर्त पुरवणारी लेखणी त्यांच्यातील परंपरावादी लेखकाचे अनुभवसिद्ध सामर्थ्य दाखवते. काळाच्या ओघात टिकून राहणारी जी लेखनकला आहे ती दांडेकरांनी स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर आणि अनुभवसमृद्धतेच्या आधारावर निर्माण केली.'
थोर दिग्दर्शक आणि कलांवत विजया मेहता म्हणाल्या की , ' अप्पांचे माणूसपण हे सहज, निरागस आणि कृतज्ञता जपणारं, धीर देणारं होते. नाटकाचे स्टेज हे कलावंत, लेखक आणि दिग्दर्शकाचा आत्मा असतो. या आत्मरूप कलाकृतीला थेट भिडण्याचे कसब स्व. अप्पांनी मला शिकवलं. नाटक हा एक आकृतीबंध असतो. तो चैतन्यमयी, जीवंत करण्यासाठी कलाकाराला जी अनुभवसमृद्ध उर्जा लागते ती ती उर्जा सहजतेने उबलब्ध करून द्यायचं काम, अप्पांनी मोठ्या ताकदीने केलं.'
या दोघांनीही मुक्तकंठाने स्व. अप्पांच्या साहित्याचा, त्यांच्यातील कलंदरपणाचा, अनुभवांचा, माणुसकीचा गौरव केला.