मुंबई : मोटारसायकलमधून पेट्रोलची चोरी करणार्या पेट्रोलमाफियांनी चार पत्रकारांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी घाटकोपरमध्ये घडली. पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. घाटकोपरच्या कामराज नगरात राहणारे पत्रकार पंकज गुप्ता यांच्या घरी शनिवारी काही कार्यक्रम असल्याने त्यांचे पत्रकार मित्र त्यांच्या घरी आले होते. जेवण आटोपल्यानंतर त्यांनी काही मित्रांना मुख्य रस्त्यापर्यंत सोडले. त्यानंतर ताहिर बेग, संतोष पांड्ये आणि शिवा देवनाथन या तीन मित्रांना सोडण्यासाठी ते बाहेर आले. या पत्रकारांनी शहीद स्मारक परिसरात त्यांच्या मोटारसायकल उभ्या केल्या होत्या. मोटारसायकल घेण्यासाठी ते या ठिकाणी आले असता काही पेट्रोलमाफिया त्यांच्या मोटारसायकलमधून पेट्रोलची चोरी करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या पत्रकारांनी दोन जणांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. मात्र ही बाब या दोन आरोपींच्या साथीदारांना समजताच त्यांनी त्यांच्या इतर १० ते १२ साथीदारांना तत्काळ घटनास्थळी बोलावले. त्यानंतर या सर्व आरोपींनी या चारही पत्रकारांना जबर मारहाण करत त्यांच्यावर विटांनी हल्ला केला. पोलीस घटनास्थळापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच सर्व आरोपींनी या पत्रकारांवर हल्ला करून पळ काढला होता. त्यामुळे पोलिसांच्या हाती कोणीही लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ चारही पत्रकारांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यामध्ये पंकज गुप्ता यांचा हात फॅक्चर झाला असून, इतर तीन जणांना मुका मार लागला आहे. या मारहाणीत दोन आरोपींनी गुप्ता यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोनसाखळी आणि ताहीर यांच्या खिशातून काही रोख रक्कम पळवली. याबाबत पंतनगर पोलिसांनी शनिवारी रात्रीच १० ते १२ आरोपींवर गुन्हा दाखल करून यातील शैलेश करकड आणि परेश गवळी या दोन आरोपींना अटक केली. यातील शैलेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात याअगोदरदेखील सहा ते सात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला पूर्वी तडीपारदेखील केले होते. (प्रतिनिधी)
घाटकोपरमध्ये पेट्रोलचोरांकडून चौघांवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: May 26, 2014 02:14 IST