पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या प्रवेशासाठी तिसरी आॅनलाइन प्रवेश यादी बुधवारी सकाळी १०.३० वाजता जाहीर करण्यात आली; मात्र तीन प्रवेश फेऱ्या घेऊनही तब्बल ५ हजार ४१५ विद्यार्थ्यांना कुठेही प्रवेश मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आता चौथी फेरी घेतली जाणार आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील ७३ हजार ३८५ जागांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशासाठी केवळ तीन फेऱ्या घेतल्या जातील, असे प्रवेश समिती व शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले होते; मात्र तीन फेऱ्या घेऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर असल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या फेरीतून १८ हजार ७६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांना येत्या १४ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली आहे.शिक्षण विभागाने अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी तीनच फेऱ्या घेतल्या जातील, असे जाहीर केले होते. मात्र, वाणिज्य (इंग्रजी) शाखेचे १ हजार ४८० विद्यार्थी आणि विज्ञान शाखेचे ३ हजार ७९८ विद्यार्थ्यांना आणि दोन्ही शाखांसाठी अर्ज भरलेल्या १७७ विद्यार्थ्यांना कुठेच प्रवेश मिळाला नाही. सध्या विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी जागा रिक्त नसल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नाही. परंतु, अद्याप कुठेच प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी चौथी फेरी घेतली जाणार आहे. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी येत्या १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल. चौथ्या फेरीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १९ व २० जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन ५० रुपये शुल्क भरून प्रवेश घेता येईल. (प्रतिनिधी)सतरा हजार विद्यार्थी वंचितपुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाच्या जागांसाठी दोन प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या असून, बुधवारी तिसरी फेरी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या फेरीतून ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांना, तर दुसऱ्या फेरीतून ८ हजार ९८९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले होते. त्याचप्रमाणे अल्पसंख्याक, इनहाऊस व व्यवस्थापन कोट्यातून १० हजार ५१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे आत्तापर्यंत केवळ ५६ हजार १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अकरावी प्रवेशाच्या ७३ हजार जागांसाठी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले आहेत. त्यातील ५६ हजार १३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने आत्तापर्यंत सुमारे १७ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीतून प्रवेश मिळतील; मात्र उर्वरित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.विद्यार्थी, पालकांचा प्रवेशावरून गोंधळमुलीला घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला, एकाही प्रवेश यादीतून प्रवेश मिळाला नाही, आॅनलाइन पद्धतीने प्रवेश मिळाला होता; मात्र काही कारणास्तव ५० रुपये शुल्क भरून प्रवेश घेता आला नाही, अशा अनेक तक्रारी घेऊन आलेल्या विद्यार्थी व पालकांनी बुधवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात गोंधळ घातला.पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागांसाठी केवळ आॅनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेशाच्या तीन फेऱ्या घेण्यात आल्या असून, येत्या १८ जुलैपासून कनिष्ठ महाविद्यालये नियमितपणे सुरू होणार आहेत; मात्र अनेक विद्यार्थ्यांना अद्याप अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे बुधवारी संतप्त पालकांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यलायात गर्दी केली; मात्र विभागीय शिक्षण उपसंचालक काही कामानिमित्त अहमदनगर येथे गेले होते, तर सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत या आॅनलाइन प्रवेशाच्या कामाबाबत बाहेर गेल्या होत्या. प्रवेशाबाबतच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याने विद्यार्थी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यलयात गोंधळ घातला.अकरावी प्रवेशासाठी केवळ तीनच फेऱ्या घेतल्या जातील. तसेच, पहिल्या व दुसऱ्या फेरीतून प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीतून प्रवेश मिळेल, असेही शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, तिसऱ्या फेरीतूनही प्रवेश न मिळाल्याने आज अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली. तसेच, प्रवेश मिळूनही ५० रुपये शुल्क भरून प्रवेश निश्चित न केल्याने सुमारे १० ते १५ हजार विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर पडले आहेत. त्यातीलही काही विद्यार्थ्यांनी बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली. अखेर मीनाक्षी राऊत यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयात येऊन विद्यार्थी व पालकांशी संवाद साधावा लागला. त्यानंतर कार्यालयातील गर्दी ओसरली.
अकरावी प्रवेशाची चौथी फेरी
By admin | Updated: July 14, 2016 00:56 IST