शिवाजी गोरे- दापोली -कृषी क्षेत्रात पक्ष्यांना महत्त्वाचे स्थान आहे. या पक्ष्यांचे वर्गीकरण करणारे राज्यातील पहिले पक्षी वर्गीकरण केंद्र डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात सुरू होणार आहे. या केंद्राला (आयसीएआर) भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी मंजुरी दिल्याने आता शेतीला उपयुक्त व हानिकारक पक्ष्यांचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचे पीक हाताशी येते, तेव्हा मोठ्या प्रमाणात पक्षी ते खाऊन टाकतात. त्यामुळे पिकाची हानी होते. यापुढे हे टाळणे शेतकऱ्याला सहज शक्य होणार आहे. याचे कारण आपल्या पिकावरील कीडरोग टाळण्यासाठी शेतकरी सर्रास रसायनाचा वापर करतात. त्यामुळे पिकावरील कीटक नष्ट होतात. त्यामुळे शेतीत पक्षी येणेसुद्धा बंद होते. शेतीत कोणते पक्षी कोणत्या कालावधीत येतात, त्या पक्ष्यांमुळे शेतपिकाला कोणता फायदा होतो, शेतातील कोणत्या झाडामुळे शेतीला फायदेशीर व नुकसान पोहोचवणारे पक्षी येतात, शेतात झाड असल्यामुळे कोणता फायदा व तोटा होतो, यावर संशोधन केले जाणार आहे. शेतातील पिकावरील किडे अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढल्यास त्याचा फायदा शेतीला होणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांना शेतीत खिळवून ठेवण्यासाठी त्या प्रकारचे झाडे लावणे गरजेचे आहे. याबाबत संशोधन होणार आहे. कोकणात भातपिकाची हानी करणारे पक्षी आढळून येतात, तर काही वेळेला पिकावरील किडे अळ्या खाणारे पक्षीसुद्धा आढळून येतात. या दोन्ही पक्ष्यांचे वर्गीकरण करून पक्षी व त्याचे खाद्य आढळून येणारे हंगाम याबाबत सखोल संशोधन केले जाणार आहे. कोकणातील दुर्मीळ पक्ष्यांवर अभ्यास होऊन त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.यावर होणार संशोधन..!कोकणातील पिकासाठी कोणते पक्षी फायदेशीर आहेत, ते पक्षी कोणत्या हंगामात, कोणत्या भागात प्रामुख्याने कोणत्या झाडावर आढळून येतात, कोणते पक्षी जमिनीवर कोणत्या वेळी वास्तव्य करतात, ते काय खातात. शेतातील झाडामुळे पिकावरील अळ्या, किडे खाणारे कोणते पक्षी कोणत्या हंगामात येतात, यावर विद्यापीठातील वनशास्त्र महाविद्यालयातील शास्त्रज्ञ संशोधन करणार आहेत.महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्यामुळे शेतीचे होणारे नुकसानही कमी होणार आहे. शेतीला नुकसान पोहोचवणारे पक्षी दूर हाकलण्यासाठी तशा प्रकारचे ‘सेन्सर’ बसवून ध्वनीलहरी निर्माण केल्या जाणार आहेत. तसेच कोकणातील कोणत्या हंगामात कोणते पक्षी येतात, कोणती झाडे शेतीच्या बांधावर लावावीत, यावर सखोल संशोधन सुरू आहे. - प्रा. विनायक पाटील, वनशास्त्र महाविद्यालय, कोकण कृषी विद्यापीठअॅग्रिकल्चरल आॅनिथोलॉजी प्रोजेक्टसाठी कुलगुरू डॉ. किसन लवांडे, तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भावे, प्राध्यापक व सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. नारखेडे यांनी विशेष प्रयत्न केले. तीन वर्षे हा प्रकल्प सुरू राहणार असून प्रा. विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तीन वर्षे सुरू राहणार आहे.
दापोलीत पहिले पक्षी वर्गीकरण केंद्र
By admin | Updated: November 24, 2014 23:57 IST