केळवे-माहीम : डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा सहन न झाल्याने नालासोपारा येथील एका कुटुंबातील तीन सदस्यांनी वैतरणा खाडीत चालत्या गाडीमधून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील एक महिला वाचली असून, दोघा जणांचा पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा येथील प्रशांत राणे व त्याचे कुटुंब गुरुवारी सकाळी सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करत होते. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कुटुंबातील सर्वच जण खूप तणावात होते. त्या वेळी या कुटुंबातील प्रशांत राणे, त्याची पत्नी पूर्वी राणे आणि मुलगी असे तिघेजण प्रवास करत असताना त्यांची गाडीमध्ये बाचाबाची झाली. या वेळी वैतरणा पूल क्र. १२ येथे गाडी आली असता या तिघांनीही उड्या मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पूर्वी प्रशांत राणे ही वाचली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला घाबरलेली असून, चुकीची माहिती देत असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच ज्या ठिकाणाहून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला व पाण्यातून निघाली त्या ठिकाणी पाण्याचा ओघ जास्त असून, तिला कोणतीही जखम न होणे व एकंदरीत ती देत असलेली माहिती संशयास्पद आहे. ही महिला पूर्ण शुद्धीत आल्यावर खरे काय ते कळेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)
कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न?
By admin | Updated: August 15, 2014 02:54 IST