स्मृती इराणी : देशात शिक्षणक्षेत्राचा कायापालट करणार नागपूर : भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हेरगिरीची उपकरणे सापडल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आरोप केले. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांमध्ये बेबनाव असल्याने कुणीतरी एका मंत्र्यांची हेरगिरी करीत असल्याच्या आरोपाबाबत छेडले असता स्मृती इराणी यांनी या बाबीत आपल्याला पडायचे नाही. काँग्रेसच्या या घाणेरड्या राजकारणाचा आता कंटाळा आला असून मंत्रिमंडळात कसलाही बेबनाव नाही. यासंदर्भात तुम्ही नितीन गडकरी यांनाच काय ते विचारा, असे उत्तर दिले. काँग्रेसच्या या आरोपात कुठलेही तथ्य नसून कुठल्याही मुद्यावर काँग्रेसने राजकारण करू नये, असा सल्लाही मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी जाता-जाता दिला. विज्ञान भारतीच्यावतीने आयोजित रेशीमबाग येथील डॉ. कलाम यांच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशाच्या एकूणच शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याचा विचार आहे. त्यासाठी शिक्षणतज्ज्ञांची मते विचारात घेऊन सरकारतर्फे धोरणे आखली जातील, असे सांगितले. देशात कुठलाही हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे योजना करण्यात येत आहे. याशिवाय पंतप्रधांनाच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ८ वी ते पीएच. डी. पर्यंतचे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना योग्य ते प्रमाणपत्र देण्याची योजना प्रस्तावित आहे. ज्यामुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या पण प्रमाणपत्राअभावी शिक्षणाला मान्यता नसणाऱ्या विद्यार्थ्यांना एका विशिष्ट निकषांवर योग्य प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था होईल. यासाठी नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार करीत आहोत. याप्रसंगी युपीएससी बाबत प्रश्न केला असता त्यांनी हे आपल्या मंत्रालयांतर्गत येत नसल्याचे सांगितले. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी अनेक योजना केंद्र शासनाने आखल्या असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. संशोधनाला विशेषत्वाने प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोचिंग क्लासेसचेच भूत आहेत. त्याला भरमसाट पैसा लागतो, त्यामुळे पालक चिंतित आहे. पण शिक्षण संस्थांमध्ये योग्य शिक्षण मिळावे आणि क्लासेसची गरज भासू नये म्हणून मदनमोहन मालवीय यांच्या नावाने एक प्रकल्प राबविणार आहोत. यात शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल. सर्व शासकीय शाळांची सुधारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सातवीतल्या मुलाला गंगाशुद्धीकरण प्रकल्पासाठी आमंत्रण याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्मृती इराणी यांना विविध प्रश्न विचारले. एका सातवीतल्या मुलाने पाण्याच्या शुद्धीकरण प्रकल्पात संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी इराणी यांनी त्याला थेट वारणसी येथे सुरू असलेल्या गंगा शुद्धीकरण प्रकल्पात काही काळ काम करण्यासाठी आमंत्रित केले. कार्यक्रमानंतर त्यांनी त्या मुलाचा पत्ता आणि नाव विचारले तसेच या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे आश्वासन दिले.
काँग्रेसच्या आरोपात तथ्य नाही
By admin | Updated: July 30, 2014 01:22 IST