मुंबई : मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडणे बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिली.गेल्या वर्षीही दुष्काळामुळे मराठवाड्यासाठी ७.११ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यापैकी ४.७९ टीएमसी पाणी पोहोचले होते. यंदा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पैठण धरणात १५ आॅक्टोबरला पाणीसाठा १२९ द.ल.घ.मी. असून खरीप हंगामातील पाणीवापर १८७ द.ल.घ.मी. एवढा आहे. एकूण उपलब्ध पाणी ३१६ द.ल.घ.मी. आहे. त्याची संकल्पित पाणीसाठ्याशी १४.५५ एवढी टक्केवारी आहे. ही टक्केवारी ३७पेक्षा कमी असल्याने समन्यायी पाणीवाटपासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.१२.८४ टीएमसी पैठण धरणात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.
समन्यायी पाणीवाटप
By admin | Updated: October 20, 2015 01:29 IST