कोल्हापूर : सामाजिक, शैक्षणिक, कृषी आदी क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणारे कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे मोठे राजे होते. त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी केलेले काम अलौकिक आहे. त्यांचे सामाजिक न्याय प्रस्थापनेचे लोकोत्तर कार्य जर्मन वाचकांनाही प्रभावित करणारे आहे. दलितांच्या हक्कांसाठी लढणारा, शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या शाहूंची ओळख करून देणारा हा जर्मनमधील अनुवादित ग्रंथ आहे, असे प्रतिपादन फेडरल रिपब्लिक आॅफ जर्मनीचे कौन्सुल जनरल मायकेल सीबर्ट यांनी आज, बुधवारी येथे केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य’ या जर्मन अनुवादित चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील सिनेट हॉलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, जिल्हाधिकारी राजाराम माने, स्वीत्झर्लंडमधील अॅटोमेशन इंजिनिअर व अनुवादक सुधीर पेडणेकर, माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, वित्त व लेखाधिकारी डॉ. व्ही. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठ व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीने कार्यक्रम आयोजित केला.सीबर्ट म्हणाले, गोरगरीब जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी सामाजिक न्याय व शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी अखंडितपणे प्रयत्न करणाऱ्या राजर्षी शाहूंचे कार्य अतुलनीय आहे. शंभर वर्षांपूर्वी इतक्या पुरोगामी विचारसरणीचा राजा कोल्हापूरमध्ये होऊन गेला, हे भारताचे भाग्य आहे. सर्वसामान्य जर्मन नागरिकाला राजर्षी शाहूंचे कार्य समजावून देण्यास हा ग्रंथ उपयुक्त असून तो जर्मन विद्यापीठांमध्ये ठेवला जाईल.श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, राजाराम महाराज हे जर्मन तंत्रज्ञानाने प्रभावित होते. तंत्रज्ञानासह युरोपियन महासंघातील पिछाडीवरील देशांच्या उन्नतीसाठी जर्मनी प्रयत्नशील राहिली. पेडणेकर म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांचा ग्रंथ जर्मन भाषेत अनुवाद करण्याची संधी दिली. अनुवाद करताना मूळ आशयाला धक्का न लावण्याचे आव्हान होते. राजर्षी शाहूंमुळे माझे वडील के. डी. पेडणेकरांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांच्यामुळे आम्हाला. या ग्रंथाचे काम हाती घेण्याचे प्रमुख कारण हे राजर्षी शाहूंच्या ऋणातून थोडे का होईना उतराई होण्याचा माझा प्रयत्न होता. यावेळी अॅड. शिंदे यांचेही भाषण झाले.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, मानवी मूल्यांचे महान पुरस्कर्ते असलेल्या शाहूंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जागतिक पातळीवर या ग्रंथाद्वारे पोहोचले आहेत. प्रारंभी शाहीर राजू राऊत यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनावरील पोवाडा मराठीसह इंग्रजी, जर्मनी भाषेत सादर केला. यावेळी गोविंद पानसरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, हिंदकेसरी दीनानाथसिंह, डॉ. रमेश जाधव, व्ही. बी. पाटील, साहित्यिक राजन गवस, प्रा. व्यंकाप्पा भोसले, वसंतराव मुळीक, वसुधा पवार आदी उपस्थित होते. डॉ. अरुंधती पवार यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)जर्मनीत विनामूल्य वितरणमहाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या माध्यमातून राजर्षी शाहूंचे कार्य जगभर पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. चौदा प्रादेशिक भाषा आणि रशियन, जपानी भाषेत ‘शाहू चरित्र’ प्रकाशित करणार असल्याचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, पेडणेकर यांनी अनुवादासाठी मानधन घेतले नाही. अनुवाद आणि छपाईसाठी सहा लाख रुपये खर्च केले. वडीलांच्या स्मरणार्थ ते जर्मनीतील विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये ग्रंथाचे विनामूल्य वितरण करणार आहेत.सीबर्ट यांचे ‘नमस्ते’...मखमली रंगाचा कोल्हापुरी फेटा बांधलेल्या मायकेल सीबर्ट यांनी ‘नमस्ते’ असे म्हणत सुरुवात केली. कोल्हापूरकरांच्या आदरातिथ्याने भारावून गेल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जर्मन वाचक हे संवेदनशील आहेत. ते लक्षात घेऊन सुधीर पेडणेकर यांनी अनुवाद उत्तम प्रकारे केला आहे. ते जर्मनीतील पहिले अनुवादक ठरले असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.शिवाजी विद्यापीठात बुधवारी ‘राजर्षी शाहू छत्रपती : जीवन व कार्य’ या जर्मन चरित्रग्रंथाचे प्रकाशन फेडरल रिपब्लिक आॅफ जर्मनीचे कौन्सुल जनरल मायकेल सीबर्ट यांनी केले. यावेळी डॉ. जयसिंगराव पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सुधीर पेडणेकर, अॅड. श्रीपतराव शिंदे उपस्थित होते.
महामार्गासाठी संपादित जमिनीच्या अवार्ड सर्वेक्षणात घोळ !
By admin | Updated: November 13, 2014 00:33 IST