राम देशपांडे / अकोलाप्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचत, या उद्देशाने पुण्यातील एका खासगी कंपनीने निर्माण केलेल्या ई-रिक्षा लवकरच अकोल्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. केवळ प्रवासी वाहतुकीसाठीच नव्हे, तर माल वाहतुकीसाठीदेखील ई-रिक्षाचा वापर करता यावा, यासाठी निर्मात्या कंपनीने जवळपास ७५ प्रकारचे मॉडेल्स विकसित केले आहेत.वाहतुकीची समस्या अकोला शहराच्या पाचवीला पुजली आहे. पूर्वीच्या तुलनेत लोकसंख्यादेखील मोठय़ा प्रमाणात वाढली असून, रस्ते व गल्लीबोळांमध्ये प्रदूषण फैलविणार्या वाहनांमुळे अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वाहनांमुळे निर्माण होणार्या प्रदूषणाचा तुम्ही, आम्ही सर्वजण दररोज प्रत्यक्ष अनुभव घेत असतो. शाळेत जाणारी बालकेदेखील नकळतपणे याचा सामना करीत असतात. नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहिल्यास इंधनाच्या दरवाढीमुळे प्रत्येकाचा जीव मेटाकुटीस आला आहे. या सर्व बाबींवर तोडगा काढीत पुण्यातील एका वाहन निर्मिती करणार्या कंपनीने शाळेत जाणार्या मुलांसाठी ऑटो, चाकरमान्यांसाठी फोरसिटर कार, प्रवासी व माल वाहतूक सहजरीत्या करता यावी, यासाठी ४५0 ते १ टन वजनाच्या ई-रिक्षा केल्या आहेत. ताशी ३0 कि.मी. धावणार्या गाड्यांसाठी आरटीओचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, ई-रिक्षेची गती ताशी २५ ते ३0 कि.मी. असल्याने त्यास आरटीओची परवानगी किंवा लायसन बाळगण्याची गरज नसल्याने इंधन बचतीचा व प्रदूषण मुक्तीचा संदेश देणार्या या ई-रिक्षाचा वापर देशातील सात राज्ये करीत असून, मुंबई, पुणे व शेगावात त्या केव्हाच दाखल झाल्याचे मयाणी सांगतात. त्यांनी शाळकरी मुलांची ने-आण करणारी ई-रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर अकोल्यात आणली असून, शालेय मुलांची वाहतूक करणार्या ऑटो चालकांसाठी ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. लवकरच अकोल्यात देखील ई-रिक्षा धावणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.ई-रिक्षाची वैशिष्ट्ये.१) शहरात प्रवासी वाहतूक करणार्या इतर वाहनांच्या तुलनेत ई-रिक्षाची किंमत कमी.२) पूर्णत: भारतीय बनावटीची ही रिक्षा चार बॅटरीवर चालते.३) ६ तासात बॅटरी चार्ज केल्यानंतर १00 कि.मी. सलग धावते.५) कोणत्याच प्रकारचे इंधन लागत नसल्याने पूर्णत: इको फ्रेडली.६) बॅटरी, चार्जर, टुलकिट, स्टेपनी, हॉर्न, लाईट आदींनी सज्ज.
अकोल्यात धावणार ई-रिक्षा!
By admin | Updated: November 7, 2014 23:35 IST