सातारा : कोरेगावच्या श्री केदारेश्वर मंदिर परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण शिलालेखाचे रहस्य सातारच्या इतिहास अभ्यासकांनी उकलल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच संशोधकांच्या भुवया उंचावल्या असून, येत्या पुरातत्त्व विषयातील अनेक तज्ज्ञ कोरेगावला लवकरच भेट देणार आहेत. दरम्यान, हा ऐतिहासिक वारसा जोपासून त्यायोगे कोरेगावचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थही सरसावले आहेत. सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी केदारेश्वर मंदिर परिसरातील शिलालेखाचा जमिनीत गाडलेला भाग मोकळा करून पाहिला असता, त्यावर मजकुराबरोबरच ‘गधेगाळ’ हे चिन्ह आढळून आले. ते मूळच्या मजकुरावर नंतर कोरल्याचे दिसत आहे. याच लेखाच्या वरील बाजूस गायवासरू हे चिन्ह असून, ही दोन्ही चिन्हे एकत्रित असणारे शिलालेख आढळत नाहीत. या दोन्ही राजाज्ञा असून, एक सौम्य तर एक कडक स्वरूपाची आहे. सौम्य आज्ञेचे उल्लंघन होत असल्याने नंतर कडक चिन्ह कोरले असण्याची शक्यता ‘जिज्ञासा’च्या सदस्यांना वाटत असून, यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी या शक्यतेला दुजोरा दिला आहे. हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा दहाव्या शतकातील असण्याची शक्यता असून, त्यातून इतिहासाचा एखादा अप्रकाशित पैलू उलगडू शकतो. विशेष म्हणजे, शिलालेखांवर कोरलेले वासरू गाईचे दूध पिताना दाखविले जाते. कोरेगावच्या शिळेवर मात्र गाईच्या पुढील दोन पायांच्या मध्ये उभे असलेले वासरू दाखविले असून, हेही तज्ज्ञांना वैशिष्ट्यपूर्ण वाटते. त्यामुळे तज्ज्ञांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरेगावला लवकरात लवकर भेट देऊन शिलालेखाचे वाचन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)सोशल मीडियावर चर्चाइतिहास आणि पुरातत्त्व या विषयांना वाहिलेल्या सोशल मीडिया ग्रुपवर ‘लोकमत’ची बातमी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. यातील काही ग्रुपमध्ये दीड-दीडशे अभ्यासू सदस्य आहेत. त्यामुळे संशोधक, अभ्यासकांमधील उत्सुकता आणखी वाढली असून, यातील चिन्हांच्या वेगळेपणाविषयी चर्चा रंगल्या आहेत.आता प्रतीक्षा मान्यवरांची...गद्धेगाळ या विषयावर संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाने नेमलेल्या समितीचे प्रमुख प्रा. डॉ. कुरूष दलाल, मुंबईच्या साठे महाविद्यालयातील पुरातत्त्व अभ्यासक प्रा. डॉ. सूरज पंडित, राज्य पुरातत्त्व खात्याचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. दाऊद दळवी, समन्वयक प्रवीण कदम, पुण्याच्या डेक्कन कॉलेजतील शिलालेखाचे ठसेतज्ज्ञ डॉ. अभिजित दांडेकर आदी मान्यवरांनी या शिलालेखाचे वाचन आणि संशोधन करण्याची इच्छा प्रकट केली असून, लवकरच हे मान्यवर कोरेगावला भेट देणार आहेत, असे ‘जिज्ञासा’च्या सदस्यांनी सांगितले.‘सयाजीराव’मध्ये जाहीर वाचन‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे आणि सागर गायकवाड हे दोघे महाराजा सयाजीराव विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेत सोमवारी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसमोर ‘लोकमत’च्या बातमीचे जाहीर वाचन करण्यात आले. दरम्यान, ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी या शिलालेखावर संशोधन प्रक्रिया सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जतनीकरणासाठी हालचाली सुरूकोरेगाव : कोरेगावात सापडलेल्या या ऐतिहासिक शिलालेखाच्या जतनीकरणासाठी ग्रामपंचायत, केदारेश्वर ट्रस्ट आणि ग्रामस्थ सरसावले आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या ठेव्याचे जतनीकरण करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.या शिलालेखाचे महत्त्व पडल्यामुळे तो योग्य जागी हलविण्याच्या दृष्टीने सोमवारी सायंकाळी केदारेश्वर मंदिर परिसरातच बैठक झाली. सरपंच विद्या मनोज येवले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, ट्रस्टचे उपाध्यक्ष युवराज बर्गे यांच्यासह सुनील बर्गे, शरद जाधव, रमेश नाळे, प्रदीप बोतालजी, शंकर बर्गे, ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, नीलेश पंंडित, धैर्यशील पवार, शीतल दीक्षित यावेळी उपस्थित होते. कोरेगावात अमूल्य ऐतिहासिक ठेवा असून, त्याची जोपासना केल्यास पर्यटनाच्या माध्यमातून गावाचा विकास करता येईल, या दृष्टीने यावेळी चर्चा झाली. यासाठी लवकरात लवकर हा शिलालेख योग्य ठिकाणी हलविण्यात यावा, असे सुचविण्यात आले. (प्रतिनिधी)
रेडिमेड अवजारांमुळे कारागिरांची उपासमार
By admin | Updated: June 30, 2015 23:13 IST