राजाराम लोंढे- कोल्हापूर -आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाच्या पावडरीचे दर प्रतिकिलो सव्वाशे रुपयांनी घसरल्याने राज्यातील दूध संघ चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात प्रामुख्याने गायीच्या दुधापासून पावडर तयार केली जाते; पण तिलाच मागणी नसल्याने गायीच्या दुधाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून, गायीचे दूध स्वीकारायचे की नाही, या द्विधा मन:स्थितीत खासगी दूध संघ आहेत. ‘वारणा,’ ‘गोकुळ,’ ‘जळगाव’ या तीन सहकारी दूध संघांसह काही खासगी दूध संघ गायीच्या दुधापासून पावडर तयार करतात. देशातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र शासन दूध पावडरीच्या निर्यातीला अनुदान देत होते; पण केंद्रात आलेल्या भाजपा सरकारने जुलै २०१४ पासून निर्यात अनुदान बंद केले आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर एकदम प्रतिकिलो सव्वाशे रुपयांनी घसरल्याने दूध संघांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गायीचे दूध स्वीकारायचे की नाही, असा पेच निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दर नाही; पण पावडर ठेवायची कोठे, असा प्रश्न संघासमोर असून केंद्र शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावी अशी मागणी होत आहे. केंद्र शासनाने निर्यात होणाऱ्या पावडरीच्या दरावर १५ टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर शासनाने दूध पावडर तयार करून ‘एनडीडीबी’च्या माध्यमातून विक्री करावी, असा दूध संघाचा प्रस्तावही आहे. दिवसाला ५० हजार लिटरची पावडर राज्यात दिवसाला साधारणत: ५० हजार लिटर गायीच्या दुधाची पावडर केली जाते. यापासून साडेचार हजार किलो पावडर व २२०० किलो लोण्याचे उत्पादन दिवसाला होते. एवढ्या पावडरीचे करायचे काय? असा प्रश्न असून संघाच्या गोदामामध्ये पावडरची थप्पी लागली आहे. आता नाकारून उद्या काय करायचे?आता गायीचे दूध जास्त आहे. त्यातच पावडरीचे दर पडल्याने दूध नाकारले, तर उद्या कृश काळात दूध आणायचे कोठून? असा प्रश्नही दूध संघासमोर आहे; पण हे दूध स्वीकारून विक्री करायची, तर १६ रुपये दर मिळत असल्याने तोट्यातील धंदा करावा लागत असून संघासमोर पेच निर्माण झाला आहे. पावडरीची मागणी कमी झाल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र शासनाने पावडर निर्यातीला अनुदान देऊन दूध संघांना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढावे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीचे अध्यक्ष विनायक पाटील यांनी सांगितले.दुधापासून पावडर तयार करण्यात जगात सर्वांत जास्त वाटा न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया या देशांचा आहे. गेली दोन वर्षे या देशांत दुष्काळ असल्याने दुधाचे, पर्यायाने पावडरीचे उत्पादन घटले होते. यंदा परिस्थिती वेगळी आहे. येथे पावडरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला. साहजिकच भारतीय बाजारपेठेत दराची घसरण झाली आहे. सध्या दुधाचा प्लस सीझन सुरू असल्याने दूध जास्त आहे. अशा परिस्थितीत दुधाची पावडर करता येत नसल्याने दुधाचे करायचे काय, हा प्रश्न दूध संघांसमोर आहे. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया या देशांत यंदा जास्त पावडर तयार झाली असून, त्यांनी वापरलेल्या मार्केटिंग पॉलिसींमुळे इतर देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. - बी. बी. भंडारी ( जनरल मॅनेंजर, मार्केटिंग, वारणा दूध संघ)असे आहे पावडरचे गणित१०० लिटर दुधापासून ८.५ किलो पावडर व ४.३ किलो लोणी तयार होते. १०० लिटर दुधाचे पैसे (२३.५० रुपये + ५ रुपये वाहतूक) - २८५० रुपये८.५ किलो पावडरचे पैसे (सध्याचा दर १६० रुपये - २५ रुपये उत्पादन खर्च) - ११४७.५० रुपये४.३ किलो बटरचे पैसे (दर २४० रुपये - १० रुपये उत्पादन खर्च) - ९८९ रुपये पावडर न करता दुधाची विक्री केली तर - ३४०० रुपये पावडर उत्पादनात होणार तोटा - १३१३.५० रुपये
पावडरचे दर घसरल्याने दूध संघ हडबडल
By admin | Updated: November 22, 2014 00:26 IST