मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टचा विकास करताना गोदी कामगारांना, अधिकाऱ्यांना व पेन्शनधारकांना घरांसाठी २५० एकर जागेची मागणी करीत खाजगीकरणाला विरोध करणा-या गोदी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. खाजगीकरणाचा प्रयत्न केल्यास आणि मागणी मान्य केली नाही, तर कुटुंबासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक अॅन्ड जनरल एम्प्लॉइज युनियनने दिला आहे.मुंबई बंदरातील सिमेंट, कोळसा, केमिकल फर्टिलायझर हा कार्गो शहराबाहेर काढण्यासाठी सरकार पर्यावरणाचे कारण देत असल्याचा आरोप युनियनचे अध्यक्ष एस. के. शेट्ये यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. शेट्ये म्हणाले की, केंद्र सरकार उद्योगात आधुनिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणास होणाऱ्या त्रासाला निर्बंध घालू शकते. मात्र बंदरातील मालवाहतूक बंद करून खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. कुलाबा, शिवडी, वरळी, कॉटन ग्रीन, वडाळा, वाडीबंदर, माझंगाव, रे रोड येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर कामगारांच्या वसाहती आहेत. मात्र त्यांना टिटवाळा येथे पर्यायी जागा देऊन बंदराच्या जागेवर शासन तरंगते हॉटेल, मरिना पार्क व गार्डन उभारण्याचा विचार करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.
घरांसाठी गोदी कामगार आक्रमक
By admin | Updated: January 13, 2015 04:57 IST