ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - राज्यातील सर्व हॉटेलांत मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करणा-या रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी आता 'डेक्कन क्वीन'मध्येही मराठी पदार्थांची मागणी केली आहे. 'भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील तुरा असलेल्या आणि प्रवाशांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली डेक्कन क्वीनमध्येही मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत ' अशा मागणी आठवलेंनी केली आहे.
डेक्कन क्वीनच्या वर्धापनदिनानिमित्त या गाडीला नुकतीच 'डायनिंग कार' जोडण्यात आली.त्यामुळे अनेक प्रवाशांना पुन्हा या कारमध्ये मिळणा-या पदार्थांचा आनंद घेता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी 'डेक्कन क्वीन'मध्ये मराठी खाद्यपदार्थही उपलब्ध व्हावेत असे म्हटले आहे.
राज्यातील सर्व हॉटेलांत महाराष्ट्रीय पदार्थ मिळायलाच हवेत, या मागणीसाठी आठवले यांनी नुकताच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर हॉटेल मालकांच्या संघटनेने आठवले यांची मागमी मान्य केली होती. त्यामुले सर्व हॉटेलांमध्ये आता कांदेपोहे, बटाटावडा, मिसळ, उसळपाव, थालीपीठ, कांदाभजी, कोथिंबीरवडी असे अनेक पदार्थ मिळणार आहेत. त्यामुळे हॉटेल मालकांप्रमाणेच रेल्वे प्रशासन आठवलेंच्या मागणीबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.