मुंबई : पोलीस दलातील बदल्यांमुळे मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांची दहावर पदे रिक्त झाली असून त्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. क्राइम बँ्रच व महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या परिमंडळाच्या जागी नियुक्ती मिळावी म्हणून अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यासाठी इच्छुकांकडून मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बदली व बढती झालेल्या अधिकाऱ्यांना १ मे रोजीच्या परेडनंतर नव्या नियुक्तीच्या ठिकाणासाठी सध्याच्या ठिकाणाहून कार्यमुक्त केले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्य सरकारने गुरुवारी मध्यरात्री जारी केलेल्या बदल्या व बढत्यांमध्ये मुंबईतील चार उपायुक्तांना अप्पर आयुक्त/ उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्याशिवाय सहा उपायुक्तांच्या आयुक्तालयाबाहेर बदल्या झाल्या आहेत. यात गुन्हे अन्वेषण शाखेतील तीन, आर्थिक गुन्हे अन्वेषण वाहतूक नियंत्रण शाखेतील एक पद, तर ३, ९, व १२ या परिमंडळाची पदे रिक्त झाली आहेत. मुंबईचे आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडून येत्या आठवड्याभरात टप्प्याटप्प्याने त्यांची नियुक्ती होईल. आवश्यकतेनुसार सध्या कार्यरत काही उपायुक्तांचे परिमंडळ, शाखा बदलली जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नियुक्ती व्हावी, यासाठी काहींनी वरिष्ठ मंत्री, सत्ताधारी राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत व गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ‘फिल्डिंग’ लावल्याचे समजते. (प्रतिनिधी)‘फोर्सवन’चे पठाण मुंबईत मुंबईत बदलून आलेल्या उपायुक्तांमध्ये ‘फोर्सवन’चे पोलीस अधीक्षक अकबर पठाण यांचा समावेश असून चार वर्षांपासून ते त्या ठिकाणी कार्यरत होते. पठाण हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून २००७च्या उपअधीक्षक बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी परभणी व वाशिम या ठिकाणी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. ते ‘फोर्सवन’मध्ये २०१३ पासून कार्यरत आहेत.
क्राइम ब्रँच, परिमंडळ मिळविण्यासाठी चढाओढ
By admin | Updated: April 30, 2017 03:18 IST