ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. ११ - हिट अँड रन केस, काळवीट शिकार प्रकरणामुळे नेहमीच वादात सापडलेला अभिनेता सलमान खान आता पुन्हा एका नवीन वादात अडकला आहे. मुंबईतील फॅशन शोमध्ये धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी सलमान विरोधात यवतमाळमधील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी एक फॅशन शो पार पडला होता. सलमान खान या शोचा आयोजक होता. या शोमध्ये एका अरबी मॉडेलने पायावर 'अल्ला' लिहीलेले टॅटू लावले होते. यामुळे धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत एका संघटनेने सलमानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलमानसह मॉडेल आणि शोचे अन्य आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानातील कलम २९५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.