मुंबई : राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाने आता थेट ‘आॅस्कर’चा उंबरठा गाठला आहे. ‘आॅस्कर’ पुरस्कारासाठी भारतातर्फे या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली. आॅस्करच्या ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या विभागासाठी ‘कोर्ट’ निवडला गेला आहे. या घटनेमुळे मायमराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोर्टबाजीवर आधारित असलेल्या कोर्ट या चित्रपटाच्या शर्यतीत बाहुबली, बजरंगी भाईजान, पिकू आणि एनएच १० आदी भरघोस कमाई करणाऱ्या चित्रपटांचे नावे होती. मात्र ‘कोर्ट’ने बाजी मारली. मराठीला तिसऱ्यांदा मानमुंबई : आॅस्कर पुरस्कारासाठी ‘कोर्ट’च्या रूपाने मराठी चित्रपटाची तिसऱ्यांदा अधिकृत निवड झाली आहे़ यापूर्वी श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांचीही निवड झाली होती. या चित्रपटाचे चैतन्य ताम्हाणे या युवा दिग्दर्शकाने लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विवेक गोम्बर या युवा निर्मात्याने निर्मिती केली असून, यात महत्त्वाची भूमिकाही साकारली आहे. आतापर्यंत कधीही कॅमेऱ्यासमोर न आलेले चळवळीतील कार्यकर्ते वीरा साथीदार यांनी यात प्रमुख भूमिका रंगवली आहे. गीतांजली कुलकर्णी या अभिनेत्रीचीही महत्त्वाची भूमिका या चित्रपटात आहे. शाहीर संभाजी भगत यांनी यासाठी गीते लिहिली असून, त्यांनी चित्रपटाला संगीतही दिले आहे. नावाजलेले कलावंत नसतानाही आॅस्करमधील एन्ट्रीपर्यंत या चित्रपटाने गाठलेली उंची महत्त्वाची आहे. ‘कोर्ट’ या चित्रपटात एका लोककलाकाराचा प्रवास रेखाटला आहे. कार्यकर्त्याचे आयुष्य आणि लोककला यांची सांगड या चित्रपटात घातली आहे. एका कार्यकर्त्यावर त्याच्या ध्यानीमनी नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची वेळ येते. या अनुषंगाने या चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपट पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा चित्रपट म्हणूनही ‘कोर्ट’चे नाव कोरले आहे. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी ‘कोर्ट’च्या पूर्वी केवळ एक लघुपट आणि एक माहितीपट केला आहे. त्यांचे हे चित्रपट दिग्दर्शनातले पहिले पाऊल आहे. चित्रपटाच्या जडणघडणीविषयी ते म्हणतात, हा चित्रपट करताना आम्ही सगळे नवेच असल्याने आम्ही सगळेकाही सेटवरच शिकत गेलो. कोर्ट या विषयावर अभ्यास करण्यासाठी मी बरेचवेळा कोर्टात जाऊन बसायचो आणि निरीक्षण करायचो. त्या अनुभवातून हा चित्रपट तयार झाला आहे. दिग्दर्शकाचा पहिलाच चित्रपट आॅस्करला ! चैतन्य ताम्हाणे यांचा दिग्दर्शक म्हणून ‘कोर्ट’ हा पहिलाच चित्रपट आहे. मिठीबाई कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत घेतलेला अनुभव हीच त्यांची शिदोरी आहे. पृथ्वी थिएटरमध्ये ‘ग्रे एलिफंट्स इन डेन्मार्क’ हे त्यांचे नाटक गाजले होते. त्यानंतर त्यांनी लघुपटांकडे मोर्चा वळविला. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ‘कोर्ट’ या चित्रपटाचे शिवधनुष्य उचलले आणि तोच चित्रपट आॅस्करला निघाला. आॅस्करसाठी ‘कोर्ट’ चित्रपटाची झालेली निवड ही अतिशय अनपेक्षित अशी घटना आहे. ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या चित्रपटाचे सगळे कर्तेकरविते नवीन असल्याने आमच्यासाठी ही घटना अधिक महत्त्वाची आहे. - गीतांजली कुलकर्णी, अभिनेत्री, कोर्टआॅस्कर पुरस्कासाठी प्रवेशिका दाखल झाल्याबद्दल ‘कोर्ट’च्या टीमचे अभिनंदन. शिवाय आॅस्करवारीसाठी खूप खूप शुभेच्छा.- तेजस्विनी पंडित, अभिनेत्री‘कोर्ट’ची दखल घेऊन तो आॅस्करला पाठविला जाणे ही अभिमानाची बाब आहे. या चित्रपटात कोणी हीरो असेल तर तो त्याचा ‘विषय’ आहे. मराठी लोकसंगीत आज जागतिक स्तरावर पोहोचले आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे़ या चित्रपटाच्या निमित्ताने याविषयीची चर्चा घडली आहे. - शाहीर संभाजी भगत, संगीतकार, गायकभारतातून आॅस्करसाठी ‘कोर्ट’ची निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.- आमीर खान, अभिनेता‘कोर्ट’ची आॅस्करसाठी शिफारस केली जाणे हा फक्त महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. ‘कोर्ट’च्या संपूर्ण टीमच्या पुढील वाटचालीला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मनापासून शुभेच्छा़- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्रीआॅस्करच्या परदेशी भाषा विभागात ‘कोर्ट’ची प्रवेशिका पाठवल्याचा आनंद झाला आहे. मराठी चित्रपटाचे हे सुयश वाखाणण्याजोगे आहे.- सुहृद गोडबोले, अभिनेताराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवून ‘कोर्ट’ने महाराष्ट्राची शान राखली होती. आता आॅस्कर पुरस्कारांसाठी प्रवेशिका दाखल झाल्याचा आनंद आहे, निवड समितीचे आभार.- नेहा राजपाल, पार्श्वगायिकाआॅस्करसाठी प्रवेशिका दाखल झालेल्या ‘कोर्ट’ सिनेमाच्या टीमचे खूप अभिनंदन. - सई ताम्हणकर, अभिनेत्रीआॅस्करसाठी ‘कोर्ट’ची प्रवेशिका दाखल होणे अगदी योग्य निवड आहे, ‘कोर्ट’च्या चमूचे अभिनंदन.- रेणुका शहाणे, अभिनेत्रीराहुला रावेल यांचा राजीनामाआॅस्करच्या निवड समितीचे सदस्य असलेले राहुल रावेल यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. समितीचे अध्यक्ष आणि अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या उपद्रवी वर्तनामुळे आपण पद सोडल्याचे त्यांनी सांगितले. कोर्ट चित्रपटाला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आॅस्करवारीवर गेलेले मराठी चित्रपट ‘कोर्ट’ : ‘कोर्ट’ या चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच ‘कोर्टरूम ड्रामा’ हा या चित्रपटाचा पाया असला तरी केवळ कोर्टरूमच नव्हे; तर कोर्टात काम करणाऱ्यांचे बाहेरचे जगही हा चित्रपट दाखवतो. वासुदेव नामक एका सफाई कामगाराचा गटारात गुदमरून मृत्यू होतो आणि त्याचा ठपका तिथे चळवळीतील कार्यक्रम करणाऱ्या नारायण कांबळे या विद्रोही लोकशाहिराच्या माथ्यावर येतो. कोर्टात खटला सुरु होतो. श्वास : २००४ मध्ये अरुण नलावडे दिग्दर्शित ‘श्वास’ या मराठी चित्रपटाची आॅस्करसाठी निवड झाली होती. ‘श्वास’ आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो. याची कथा पुण्यातील वास्तवावर आधारित आहे. संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. ‘श्वास’ला मराठी सिनेमांमध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते. हिंदी, बंगाली, तमिळ भाषांमध्येही तो प्रदर्शित झाला.हरिश्चंद्राची फॅक्टरी : परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला. १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपट काढून महाराष्ट्रातील व भारतातील चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या या पहिल्या चित्रपट निर्मिती मागील धडपड या हलक्या फुलक्या पद्धतीने चित्रपटात चितारली आहे.
‘कोर्ट’ने चढली आॅस्करची पायरी !
By admin | Updated: September 24, 2015 01:43 IST