अकोला : पश्चिम विदर्भात सर्वत्र पिके बहरली असताना कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.भिज पावसामुळे सर्वच चांगले पीक आले आहे. मात्र किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ््या किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळींचा प्रादूर्भाव वाढला आहे.पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते चार लाख ९० हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्यांची पेरणीदेखील वाढली आहे.मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यंदा चांगले येण्याची अपेक्षा आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकऱ्यांनी दोनदा पिकांची कोळपणी, डवरणी केली. तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यंदा चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. (प्रतिनिधी)
कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला
By admin | Updated: July 25, 2016 05:06 IST