ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २८ - ‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी त्या मुलाने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले. संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि आज मुख्यमंत्री. त्याचे नाव देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने सुरु असलेली ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा आज प्रत्यक्षात अवतरली आहे.
फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’.
पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण - पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला. मनोहर जोशी यांच्यानंतर फडणवीस हे दुसरे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत.