शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

चितळे बंधू... पुणे आणि दुपारची डुलकी !

By admin | Updated: May 16, 2017 20:29 IST

पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी नामवंत शाळेच्या प्रवेशदारी आणि शनीच्या पाराजवळ चितळे बंधूंच्या दारी !

सुधीर गाडगीळ/ लोकमत एक्सक्लुझिव्हप्रातः काळापासून दोनच दारी पुणेकर रांग धरू शकतात, पाल्याच्या शाळा प्रवेशासाठी नामवंत शाळेच्या प्रवेशदारी आणि शनीच्या पाराजवळ चितळे बंधूंच्या दारी ! दुपारी एक ते तीन चितळेंचं दार बंद असते, याचा अस्सल पुणेकरांना आजवर त्रास झालाच नाही, कारण ती वेळी पुणेकरांची डुलकी काढण्याचीच होती. पण पुण्याला नाव ठेवत अपरिहार्यपणे डिग्री मिळवण्यासाठी विविध राज्यातले पाल्य व्यावसायिक शिक्षण संस्थांत दाखल झाले आणि मग आपल्या मनाप्रमाणे दैनंदिनी जगण्याच्या सोईनुसार दुकानं उघडे ठेवणा-या दुकानदारांविरोधात त्रागा करू लागले. निवृत्तीला साहित्य, कला, संस्कृतीचा आनंद देणा-या पुणे परिसरातच बंगला घेऊन मुक्कामाला येणं आवश्यक वाटू लागलं तसं तरुणांना श्रीखंड, आंबाबर्फी आणि बाकरवडीसाठी चितळ्यांच्या अटींनुसारच त्यांच्या दारी येणं क्रमप्राप्त ठरलं. गरज आपणाला आहे हा भाव ग्राहकांच्या मनात वागण्यातून बिंबवल्यानं ग्राहक, विशेषतः आम्ही पैसे मोजतो ना मग हा भाव जोपासणारे ग्राहक, चितळ्यांवरची चीड चीड विनोदातून व्यक्त करू लागले. एक विनोद हीट होता. चितळ्यांच्या दुकानाला आग लागते म्हणे! आगीचे बंब त्यांच्या दारी पोहोचेपर्यंत दुपारचा एक वाजतो. चितळे म्हणे बाहेर येऊन सांगतात की, जी काही आग विझवायचीय, ती विझवण्यासाठी चार नंतर या ! विनोदांकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या पदार्थांचा दर्जा उत्तम ठेवायचा. कुरकुरणारे ग्राहक दर्जामुळे आपल्याकडे येतीलच, ही चितळेंची भावना. त्यामुळे त्यांना जाहिरातीचे बोर्ड झळकवावे लागले नाहीत. एकावर एक फ्रीची प्रलोभनं दाखवावी लागली नाहीत. ग्राहकांना काही मस्का लावण्याच्या फंदात न पडता दर्जेदार लोणी दही विकत राहिले आणि दर्जात सातत्य राखत बाकी अलिप्त वृत्तीच चितळे परिवारानं राखली. मी माझ्या अगदी लहानपणापासून गेली 60 वर्षे चितळे यांना अनुभवतोय. 

नूमवि प्राथमिक शाळेत जाताना, कुंटे चौकाजवळ एका दुकानाच्या दारी टांगलेली साखळी खेचत निवांत उभे असलेले भाऊसाहेब रघुनाथराव हे आद्यपिढीतले चितळे पाहिलेले आहेत. बंद गळ्यापर्यंत गुंड्या असलेला पांढरा फूल शर्ट, धोतर, काळा कोट, चष्म्याआड वटारलेले काळेभोर डोळे, अंगठा ओठावर दाबत, पुणेकरांना न्याहाळणारे. त्यावेळी फक्त सकाळी दुधाचाच व्यवसाय असल्यानं बाकी वेळ त्यांना निवांतपणा असे. पत्रकारितेत आल्यानंतर माझ्याशी त्यांच्या गप्पा झाल्या. साता-याच्या अलीकडे लिंबगोवा हे त्यांचं गाव. पेशव्यांनी चिपळुणातून त्यांना इथे आणले. अठ्ठेचाळीसला घर जळाले. मग भिलवडीला गेले. क्लॉथ टेस्टर म्हणून लक्ष्मी विष्णूत काही काळ नोकरी केली. कोलकात्याला बदली झाल्यानं नोकरी सोडून वडिलांसमवेत भिलवडीत दुधाच्या धंद्यात आले. इथं यायलाही कारणीभूत चिन्नप्पा चौगुले होगाडे. तो रेल्वेत भेटला आणि म्हणाला, चला आमच्या गावाला. म्हणून भिलवडी. एक गमतीदार गोष्ट म्हणजे, दुधाचं रेल्वे कंत्राट मिळवण्यासाठी डिपॉझिट भरायला अच्युतराव पटवर्धनांनी पैसे दिले होते. दूध उत्पादन आणि विक्रीत इतके रमले की सिनेमा नाटक गाणं याला गेलेच नाहीत. एकच पाहिलेला सिनेमा आठवतो कुंकू. लिंबगोव्यात वाढलेल्या भिलवडीत दोन भावांच्या साथीनं डेअरीचा जम बसवलेल्या पुण्यात स्वतःचं स्थान कमावलेल्या चितळे बंधूंनी गुणवत्तेच्या बळावर फक्त जगभर चितळे ब्रँड बनवला. बाकरवडी जगभर त्यांचं नाव घेऊन गेली. शिक्षण प्रसारकसारख्या संस्थेत सेवा बजावत, हॉस्पिटल्सना देणग्या देत, आब राखत मर्जीनं भाऊसाहेब जगले आणि अलिकडेच निर्वतले. त्यांचे बंधू भिलवडीतच आहेत. पुढच्या तीन पिढ्या उद्योगाचा वसा पुढे चालवतायत. पुढत्या पिढ्यांनी शिक्षणात रस घेतला. चवथ्या पिढीत पाच चितळे तरुण इंजिनीअर झाले. ज्येष्ठ डेअरीत लक्ष घालतात. पुढच्या पिढीतले हुशार तंत्रज्ञ या नामवंत पदार्थांचा दर्जा टिकवण्यासाठी नवनवी तंत्र शिकत अत्याधुनिक मशिन्स घेतात. काही जण दुकान सांभाळतात. काही जण फ्रेंचायजीच्या माध्यमातून विस्तार करण्यात लक्ष घालतात. चितळे भगिनी नव्या पिढीशी संवाद करत, संस्कार करत चितळे बंधूंचा एकोपा टिकवतात. साधारण मोठ्या उद्योग घराण्यात तिस-या पिढीनंतर एकी दुरावल्याची उदाहरणं आहेत. इथं मात्र परवाच्या माझ्या मुलाखतीत इंद्रनील हा बी टेक झालेला चवथ्या पिढीतला चितळे, भिलवडीच्या नानासाहेब या पणजोबांपासून पुण्याच्या दुकानांतल्या काका मंडळींपासून, विश्वासरावांसारख्या डेअरी सांभाळणा-यांपासून सर्वांशी नातं जोडून आहेत. नवनवे तंत्र वेगळ्या देशातून आणण्याच्या प्रयत्नात आहे. आंबाबर्फी अमेरिकेत पण नेता येईल या परवानगीच्या उंबरठ्यावर आहे. आणि परवा तर त्यानं कहरच केला. दुपारी 1 ते 4 सुद्धा दुकान उघडं राहील, असं जाहीर केलं. आणि ती चक्क न्यूज ठरली. आता ताशी 1500 किलो बाकरवडी, हातांचा स्पर्श न करता मशिनवर उत्पादित करावी लागणार. आताच सांगतो, बासुंदी करपली नाही ना हे पाहण्यासाठी गुलाबजाम बिघडले नाही ना याचा अंदाज घेण्यासाठी, जिलबीत साखरेचं प्रमाण बिघडलं नाही ना, हे जोखण्यासाठी चितळ्यांना रोज पदार्थांची चव घ्यावी लागे. आता अत्याधुनिक मशिन्समुळे सगळं नेमकं-नेटकंच होणार आहे. चितळे सणावाराला पक्वान्न कुठलं खाणार ही चविष्ट चर्चा कायम राहणार.(लेखक मुलाखतकार आहेत)