ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १५ - भरउन्हात पोलिस भरतीसाठी शारिरीक चाचणी घेतल्याने तरुणांचा बळी गेल्यानंतर पोलिस प्रशासनाला अखेर जाग आली आहे. पोलिस भरतीसाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी चाचणी घ्यावी असे आदेश मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारीया यांनी दिले आहेत.
पोलिस भरतीसाठी सध्या शारिरीक चाचणी सुरु असून भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना धावण्यासाठी पाच किलोमीटरचे अंतर देण्यात आले होते. भरउन्हात ही चाचणी देताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत होती. या चाचणी दरम्यान मुंबईत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे पोलिस भरती प्रक्रियेविरोधात संताप निर्माण झाला होता. अखेरीस मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारीया यांनी भरती प्रक्रियेच्या ठिकाणांची पाहणी करुन चाचणीची वेळ बदलण्याचे आदेश दिले. तसेच भरतीच्या ठिकाणी वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याशिवाय उमेदवारांच्या तक्रारींचीही दखल घ्या असे त्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिका-यांना बजावले आहे. या घटनेची गंभीर दखल गृहखात्याने घेतल्याचे वृत्त आहे. आता राज्यभरातील भरती केंद्राची पाहणी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.