पुणे : विज्ञान, तंत्रज्ञान आणि विश्वास हा देशाच्या भविष्याचा ‘ट्रायपॉड’ आहे. श्रीमंतांपेक्षा गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हेच देशापुढचे खरे आव्हान असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.नटराजन एज्यूकेशन सोसायटी (एनइईस) आयोजित ‘एनइईस इनोव्हेशन अँवार्डस २०१५’ च्या वितरणसोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी व्हर्टो अॅँड असोसिएटसचे वरिष्ठ अधिकारी रमेश मिराखूर, दिनेश देव, डॉ. उमा गणेश आणि एनइईसचे प्रिन्सिपल विश्वस्त आणि झेंन्सार टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गणेश नटराजन उपस्थित होते. एमआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर थीम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला ३० हजार रुपयांचे द्वितीय व विद्या प्रतिष्ठान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगला २० हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.तंत्रज्ञानाशिवाय देशाला भवितव्य नसल्याचे सांगून डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘आपल्या देशात ५५ टक्के तरूण असे आहेत, त्यांना ‘हे घडू शकत नाही’ किंवा ‘ही गोष्ट अशक्य आहे’ हेच मुळी मान्य नाही. त्यांचा दृष्टीकोन हा सकारात्मक असून, सातत्याने नवीन काहीतरी करण्याची संधी ते शोधत असतात. जो खरा इनोव्हेटिव्ह असतो तो आपल्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी पहात असतो. पण त्याची दृष्टी काहीसा वेगळा शोध घेत असते. खुल्या मनाने सर्व गोष्टींकडे आपल्याला पहाता आले पाहिजे. समस्यांपेक्षा त्याच्या उपायांचा विचार करता आला पाहिजे. देशाच्या लोकसंख्येनुसार १२५ कोटी मेंदू कार्यरत आहेत, त्यातून नक्कीच काहीतरी घडू शकते. इनोव्हेशन ही प्रयोगशाळेतच नव्हेतर कुठेही होऊ शकतात आणि हे काम तरूणांच्या हातूनच घडेल.’’ (प्रतिनिधी)४‘डिजिटल इनोव्हेशन फॉर इन्क्लूझिव्ह इंडिया’ या विषयावर मान्यवरांनी विचार व्यक्त केले. आज देशातील जनतेला डिजिटली साक्षर करण्याची गरज लक्षात घेऊन पुण्यात २० केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लोकांना सहजरित्या माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक कागदाचे डिजिटलायझेशन होणे ही आता काळाची गरज बनली आहे, या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.
गरिबांना उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करणे हे आव्हान
By admin | Updated: May 28, 2015 00:42 IST