जनभावनांची कदर: राजनाथ सिंग यांचा निर्णयनबीन सिन्हा/ नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिला आहे.केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथसिंग यांची मंगळवारी भेट घेऊन जनभावनांची दखल घेत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. राजनाथसिंग यांनी ही मागणी मान्य करीत गृहमंत्रालयामार्फत कार्मिक मंत्रालयाकडे सीबीआय चौकशीचा आदेश पाठवला.केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलीस आस्थापना कायद्याच्या कलम ३ नुसार याबाबत अधिसूचना काढून तपास सीबीआयकडे सोपविला आहे. तूर्तास दिल्लीच्या विशेष पोलीस शाखेकडे तपास होता. सीबीआयला निर्धारित मुदतीत तपास पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील भाजपच्या असंख्य नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुंडेंच्या अंत्यसंस्काराच्यावेळी परळीवासीयांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांचे वाहन पेटवून देत आणि दगडफेक करीत संताप व्यक्त केला होता.३ जून रोजी मुंडे हे दिल्लीत विमानतळावर जात असताना त्यांच्या कारवर इंडिका कार आदळल्याने अपघात झाला होता. इंडिका कारच्या चालकाला अटक करण्यात आल्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती.
मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा तपास सीबीआयकडे
By admin | Updated: June 10, 2014 23:42 IST