मीरा खडक्कार यांचा सल्ला : ‘मी निर्भया’ विषयावर व्याख्यान नागपूर : स्वत:ला कमी लेखू नका, आत्मविश्वासाने जगा, अभ्यासूवृत्ती आणि चिकाटीने समस्यांचा सामना करा. परंतु हे करीत असताना शालिनता मात्र जपा, असा सल्ला ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅड. मीरा खडक्कार विवेकानंद सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिला. स्वानंदी या महिला बहुउद्देशीय संस्थेच्या उद्घाटन समारंभात त्या ‘मी निर्भया’ या विषयावर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अॅड. गौरी चांद्रायण होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई भुसारी उपस्थित होत्या. डॉ. खडक्कार म्हणाल्या, महिलांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते. महिलांच्या दुबळेपणाचा फायदा घेतला जात असेल तर स्वानंदीसारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या सचिव ऋतुजा गडकरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेची भूमिका विशद केली. महिलांचा आत्मसन्मान वाढवून समाजात संस्काराची बीजे रोवण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जाणार असून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक मासिकही काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष अॅड. गौरी चांद्रायण यांनी नागपूर आणि विदर्भातील महिलांना संस्थेतर्फे कवच निर्माण करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. विजयाताई भुसारी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन रश्मी फडणवीस यांनी केले. आभार अॅड. वृषाली प्रधान यांनी मानले. कार्यक्रमाला कांचन गडकरी, नीलिमा बावणे, सुमाताई सराफ उपस्थित होत्या. यशस्वितेसाठी अॅड. सुलभा ताटके, आसावरी गलांडे, संपदा आपटे, उषा बोहरे, मृणाल आपटे यांनी परिश्रम घेतले.
निर्भय व्हा, पण शालिनता जपा
By admin | Updated: August 18, 2014 00:34 IST