सिकंदर अनवारे,
दासगाव- महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार घातक टाकाऊ रासायनिक कचरा आणि वापरण्यात येणाऱ्या लोखंडी, प्लास्टिक, काच आदी वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी भंगार व्यावसायिकांचा आधार घेत आहेत. यामुळे भंगाराच्या अड्ड्यांवर कारखान्यांत वापरल्या जाणाऱ्या या वस्तू आणि रसायन सापडत आहेत. येथेच ही घातक रसायने जमिनीमध्ये जिरवली जात आहेत. रहिवासी वस्ती आणि शेतजमिनीशेजारी असणाऱ्या या भंगाराच्या अड्ड्यांमुळे ग्रामीण भागात धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे. हाकेच्या अंतरावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. मात्र तक्र ार केल्याशिवाय येथील अधिकाऱ्यांना काहीच समजत नसल्याने हे कार्यालय आणि येथील अधिकारी असून नसल्यासारखेच आहेत. यामुळे कारखानदार आणि भंगार व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.महाड औद्योगिक वसाहतीतील कारखानदार प्रदूषण कमी झाल्याचे छाती फुगवून सांगत आहेत. तसे पाहिले तर काही अंशी ते खरे देखील आहे. मात्र हे प्रदूषण कमी करण्यासाठी कारखानदारांनी भंगार व्यावसायिकांना हाताशी धरल्याचे समोर येत आहे. कारखान्यांचा हा कचरा आता भंगारवाल्यांच्या अड्ड्यावर दिसून येत आहे. कारखान्यांमध्ये हाऊस किपिंगचा ठेका काढला जातो. सर्वसामान्यांसाठी याचा अर्थ अंतर्गत साफसफाई असा असला तरी कारखानदारांच्या भाषेत हा भंगारचा ठेका असतो. यामध्ये कारखान्यातील टाकाऊ कागद, प्लास्टिक, लोखंडी सामानापासून ते वापरास अयोग्य सर्वच वस्तू या भंगार व्यावसायिकांच्या माथी मारल्या जातात. धंदा पाहिजे म्हणून हे भंगार व्यावसायिक कारखान्यांतून बाहेर टाकण्यात येणाऱ्या सर्वच वस्तू घेतात. यामुळे औद्योगिक वसाहत परिसरातील या भंगाराच्या अड्ड्यांवर अॅसिड, रसायनांचे छोटे मोठे कंटेनर, काचेच्या बाटल्या, रसायन वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी पाइपलाइन, प्रयोगशाळेतील सामान आदी साहित्य सापडते. या सामानाकडे भंगार म्हणून दुर्लक्ष केले तरी २०० लिटर ते एक हजार लिटरपर्यंतच्या केमिकलने भरलेल्या टाक्या देखील या भंगार अड्ड्यावर सापडतात. बिरवाडी टाकी कोंड, बिरवाडी कुंभार वाडा, देशमुख कांबळे, औद्योगिक वसाहतीतील रहिवासी झोन, मुंबई- गोवा महामार्गावर राजेवाडी गाव, इसाने कांबळे गाव हद्दीत अशा ठिकाणी हे भंगार अड्डे चालविले जात आहेत.महाड औद्योगिक वसाहत क्षेत्रालगत असलेल्या इसाने कांबळे गावहद्दीत आणि म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर मोठा भंगार अड्डा चालवला जात आहे. मूळच्या शेतजमिनीमध्ये मातीचा भराव टाकून हा अड्डा तयार करण्यात आला आहे. गतवर्षीच्या भंगार अड्ड्यावरील वायुगळती आणि चार कामगारांच्या मृत्यूनंतर महाड औद्योगिक वसाहतीतील जो भंगार अड्डा बंद के ला, तोच हा अड्डा आहे. या ठिकाणी राजरोसपणे केमिकल आणि भंगार उतरविले जात आहे.>दुर्घटना घडण्याची शक्यताकारखान्यांतील कामगार हा संबंधित केमिकल हाताळण्यासाठी प्रशिक्षित असतो. त्याला त्यासाठी आवश्यक सुरक्षा साधने पुरवलेली असतात. मात्र तसे कोणतेही प्रशिक्षण अगर सुरक्षा साधन भंगार व्यवसायावरील कामगारांना नसते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अपघात या कामगारांच्या अगर शेजाऱ्यांच्या जिवावरही बेतू शकतो.गतवर्षीच्या दुर्घटनेचा विसरमहाड औद्योगिक वसाहतीतील एक्झोनेबल कारखान्याच्या समोरील एका बंद कारखान्याच्या जागी भंगार व्यवसाय सुरू होता. गतवर्षी या भंगाराच्या अड्ड्यावर वायुगळती झाली होती. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला होता. भंगाराच्या अड्ड्यावर रसायन हाताळण्याचा संबंध काय? हा प्रश्न तेव्हा उपस्थित करण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाड औद्योगिक वसाहत प्रशासनाने परिसरातील सर्वच भंगार व्यावसायिकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. गतवर्षी झालेल्या या वायुगळतीचा सर्वांनाच विसर पडला आहे.>भंगार व्यवसाय हा आमच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे त्यावर थेट कारवाई आम्ही कधीही केलेली नाही. जर भंगार व्यवसायाच्या माध्यमातून प्रदूषण होत असेल तर कारवाई केली जाईल. -सागर औटी, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाड