मोहन दाते,(लेखक सोलापूर येथील पंचांगकर्ते आहेत) -मान्सूनचे आगमन वेळेवर होईल; पण १४ जूनच्या रवि - मंगळ युतीमुळे मान्सूनचा जोर मंदावेल. १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन मध्यात सरासरी गाठणारे पर्जन्यमान राहील. मृग नक्षत्र : ८ जून २०१५ रोजी सायंकाळी ५.४६ वाजता सूर्याचे मृग नक्षत्र सुरू होईल. नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. मे महिन्याच्या शेवटी रवि -शनीची प्रतियुती, मंगळ-बुध युती आणि १४ जूनची रवि-मंगळ युतीमुळे उष्णतामान कमी - जास्त होत राहील; मात्र पर्जन्यमान कमी राहील. ८,९,१०, १८, १९, २० जून या तारखांना पाऊस पडण्याची शक्यता आहे.आर्द्रा नक्षत्र : २२ जून रोजी सायंकाळी ४.४४ वाजता हे नक्षत्र लागेल. वाहन उंदीर आहे. १४ जूनच्या रवि - मंगळ पर्जन्यस्तंभक योगाचा प्रभाव १ जुलैच्या गुरू-शुक्र युतीमुळे थोडा कमी होईल व पर्जन्यमान थोडे वाढेल; पण पाऊस समाधानकारक होणार नाही. जून २२,२३,२४ व जुलै ३,४,५ पाऊस अपेक्षित आहे.पुनर्वसू नक्षत्र : सूर्याचा पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश ६ जुलै रोजी सायंकाळी ४.२३ वाजता होईल. नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. गुरू व शुक्र सजल नाडीत आहेत. १ जुलैच्या गुरू - शुक्र युतीमुळे या नक्षत्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे. दि. ६,७,८,१५ ते १९ जुलै या दिवशी पाऊस अपेक्षित आहे.पुष्य नक्षत्र : २० जुलै रोजी दुपारी ३.१५ वाजता सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होत असून, त्यावेळी इंद्र मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. २३ जुलैच्या रवि-बुध ऋतुउत्तेजक युतीचा परिणाम म्हणून पाऊस चांगला पडेल, असे वाटते. दि. २०,२१,२२,३०,३१ जुलै व आॅगस्ट १,२ पाऊस पडण्याची शक्यता आहे.आश्लेषा नक्षत्र : ३ आॅगस्ट रोजी दुपारी २.४७ वाजता सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत असून, वाहन गाढव आहे. या नक्षत्रात पाऊस दमदार होईल. ३,४,८,९ व १२ ते १६ पाऊस अपेक्षित आहे.मघा नक्षत्र : दि. १७ आॅगस्ट रोजी दुपारी १२.२४ वाजता हे नक्षत्र लागेल. या नक्षत्राचे पर्जन्यसूचक बेडूक आहे. १५ आॅगस्ट रोजी झालेली रवि - शुक्र युती व २६ आॅगस्टची रवि - गुरू युती पर्जन्यकारक योग दर्शविते. या नक्षत्राचा पाऊस अनेक ठिकाणी समाधानकारक होईल. दि. १७ ते २० आणि २६ ते ३० आॅगस्ट रोजी पाऊस अपेक्षित आहे.पूर्वा नक्षत्र : दि. ३१ आॅगस्ट रोजी सकाळी ८.२४ वाजता सूर्याचे पूर्वा नक्षत्र सुरू होईल. वाहन उंदीर आहे. या नक्षत्राचा पाऊस काही ठिकाणी चांगला होईल. दि. ८ ते ११ पाऊस अपेक्षित आहे.उत्तरा नक्षत्र : १३ सप्टेंबर रोजी उत्तररात्री २.१५ वाजता सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करतो. नक्षत्राचे वाहन घोडा आहे. रवि, मंगळ, गुरू व शुक्र हे ग्रह जलनाडीत आहेत; पण नक्षत्राच्या पावसाचे मध्यममान राहील. दि. १३, १४ व २३ ते २६ पाऊस अपेक्षित आहे.हस्त नक्षत्र : दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४४ वाजता सूर्याचे हस्त नक्षत्र सुरू होत आहे. नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. ३० सप्टेंबरची रवि-बुध युती पर्जन्यास अनुकूल आहे. या नक्षत्राचा पाऊस होईल; पण खंडित वृष्टी होईल. सप्टेंबर २७ व ५ ते ८ आॅक्टोबर पाऊस अपेक्षित आहे.चित्रा नक्षत्र : दि. ११ आॅक्टोबर रोजी सकाळी ६.४५ वाजता सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. नक्षत्राचे वाहन गाढव आहे. पाऊस विखुरला जाईल. दि. ११,१५,१६,२१ व २२ ला पाऊस अपेक्षित आहे.स्वाती नक्षत्र : दि. २४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.१३ मिनिटांनी हे नक्षत्र लागेल. नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे. २५ आॅक्टोबरची गुरू - शुक्र युती व २ नोव्हेंबरची मंगळ - शुक्र युती परस्परविरोधी परिणाम करणारी असल्याने नक्षत्राचा पाऊस पूर्वार्धात थोडाफार होईल. दि. २४,२५,२८,२९ आॅक्टोबर रोजी पाऊस अपेक्षित आहे.
सरासरी गाठणारे पर्जन्यमान
By admin | Updated: June 1, 2015 02:58 IST