पुणे : बंडगार्डन कोरेगाव पार्क आदी उच्चभ्रु भागामध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणा-या दलालाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून जेरबंद केले. या दलालाच्या ताब्यातून दोन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी दिली. राजेंद्र शिवाजी जाधव (वय 24, रा. बांद्रा गव्हर्मेंट कॉलनी, बांद्रा इस्ट, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हा मुंबईमधून वेश्याव्यवसायाकरीता पुण्यामध्ये मुली पुरवत असल्याची माहिती निरीक्षक निकम यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार निरीक्षक संजय निकम, उपनिरीक्षक मधुबाला चव्हाण, गणेश जगताप, रमेश काळे, शशिकांत शिंदे, अजित धुमाळ, सोहनलाल चुटेले, सुरेश विधाते, राकेश बोयने, संदीप होळकर, दमयंती जगदाळे, अनुराधा ठोंबरे यांच्या पथकाने एसजीएस मॉलसमोर सापळा लावला. मिळालेल्या बातमीतील वर्णनानुसार दिसत असलेल्या जाधवकडे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. तो वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवित असल्याची खात्री झाल्यावर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून दोन अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. त्यांना महिला सुधारगृहामध्ये पाठविण्यात आले आहे. यातील एक मुलगी जळगावची असून एक परप्रांतिय आहे. जाधव हा स्वत:च सेक्स रॅकेट चालवित होता. ओळखीच्या मुलींना बोलावून कंत्राटी पद्धतीने त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेत होता. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेक्स रॅकेट चालविणा-या दलालाला अटक
By admin | Updated: June 5, 2014 22:24 IST