‘आयला प्रचार करायचा म्हंजी आवघड जागेचं दुखणं होऊन बसलंया! उमीदवारानं पक्षाचं झेंडं, टोप्या, पताका, पत्रकं समदी हत्यारं दिली; पन् लढायचं कुणाबरूबर? नारूनं पारावर प्रश्न उपस्थित केला. ‘आता हे काय खुळ काढलंस? लढायच्या टायमाला हत्यार टाकून पळायचं म्हंजी, उमीदार काय म्हंतील? ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा,’ आसं म्हंतील लोकं! पन् मला एक कळंना, असा पळपुटा इच्यार तुझ्या डोस्क्यात आलाच कसा?’ शिरपानं विचारलं. ‘आरं, पक्षांनी आपल्या जोडीदाराबरूबर ‘घटस्फोट’ घेतल्यामुळं सगळी राजकीय गणितंच बिघडून गेल्याती. कालपर्यंत एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे आज अचानक एकमेकांच्या पायात पाय अडकवून पाडायची योजना आखू लागलेत! काय म्हणायचं याला?’ नारूनं खंत बोलून दाखविली. ‘ह्यालाच राजकारण म्हंत्यात. खुर्चीवर बसायचं म्हंजी ‘ह्याला गाड नि त्याला गाड’ आसंच राजकारण करावं लागतंया!’ दाजिबा म्हणाला. ‘आरं पन् ज्यांच्या इरोधात प्रचार करायचा ती आपलीच माणसं हायती. ह्यो पाव्हण्याच्या हातानं साप मारायचा उमीदवारांचा डाव हाय! आडकित्त्यात घावल्यागत झालंया बग! आयला ह्यांचं व्हायचं राजकारण आन् आपलं व्हायचं मरण! रोज एकमेकांची तोंड बघायला लागत्याती आपल्याला. उमीदवारांचं काय एकदा निवडूक झाली की त्यांचं दर्शन थेट पाच वर्षांनीच!’ नारूनं दुखणं सांगितलं. खरंय राव. चार-दोन जागांसाठी पंचवीस वर्षाचा घरोबा तुटतो काय आन् पंधरा वर्षांच्या संसारात मीठ पडतं काय... ‘घराला घुस लागली म्हणून कुणी घर पाडतं का?’ घुशीचा बंदोबस्त केला आसता म्हंजी काम भागलं आसतं! पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी? पक्षानं कोंडी केल्यामुळं रोज मांडीला मांडी लावून बसणारी मंडळी एकमेकांना पाण्यात बगू लागलीय!’ दाजिबानं री ओढली. ‘तरी म्हणलं एका ताटात जेवणारं मास्तर आता एवढं लांब-लांब का राहत्यात. आन् किसनाबी नाक फेंदारून बगल देऊन निघून जातूया! हे समदं ‘घटस्फोटा’चं कारस्थान हाय! सदानं सांगितलं. ‘आरं पन् पक्षांनी ‘घटस्फोट’ घेतला म्हणून काय कार्यकर्त्यांनीबी आपल्या माणसांपास्नं ‘फारकत’ घ्याची व्हय? हे आपल्याला नाय पटत बुवा.’ नारू कळवळून बोलला. ‘पन् आता रणशिंग फुकलंय. झेंडा खाली ठेवून चालणार नाय. यंदाच्या निवडणुकीचा प्रचार म्हंजी महादेवाच्या पिंडीवरला इंचू हाय!’ दाजिबा म्हणाला. ‘ते कसं काय?’ नारूनं उत्सुकतेनं विचारलं. आरं, जसं इंचू काढावा तर महादेवाला लागतंय आन् नाय काढावा तर देवाचा अपमान; तसंच प्रचार करावा तर आपली माणसं दुखावणार आन् नाय करावा तर उमीदवाराला फटका!’ शिरपा म्हणाला. ‘यंदाच्या निवडणुकीत ‘इकडं आड नि तिकडं विहीर’ अशी गोची झालीया कार्यकर्त्यांची! चला, आताच समजूत काढली पायजे दोस्तांची.’ झेंडे पारावर ठेवून सर्वजण निघतात.
प्रदीप यादव ------