- संजय झेंडे
स्वातंत्र्यपूर्व काळात 'सत्यशोधक चळवळ' या ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाशी संबंधित चळवळीत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका अग्रेसर होता. तथाकथित धर्ममार्तंडांच्या मगरमिठीतून बहुजन समाजाची मुक्तता हा या चळवळीचा मूलाधार. त्या अनुषंगाने परंपरागत धार्मिक कर्मकांड आणि विधी करणा-या पुरोहितांची अप्रतिष्ठा करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात. या चळवळीची धुरा तत्कालिन मराठा-कुणबी पाटील समाजातील कै.विश्वासराव देवरे, माणिकराव भामरे, शंकरराव बेडसे, शिवलाल अहिरराव आणि सीताराम भामरे ही मंडळी सांभाळित असत. यातील मालपूरचे श्रीमंत शेतकरी सीताराम भामरे हे नवनियुक्त केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे आजोबा. कै. सीताराम भामरेंच्या मुशीत तयार झालेले रामराव पाटील हे डॉ.भामरेंचे वडील. उमेदीच्या काळात रामराव पाटील कम्युनिस्ट चळवळीत होते. नंतर रामराव पाटील कॉग्रेस प्रवाहात सामिल झाले. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष पद, जिल्हा कॉग्रेसचं अध्यक्षपद आणि पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याची सत्ता यापलीकडे त्यांना झेप घेता आली नाही. विधानसभा निवडणूकीत रामराव पाटील पराभूत झाले, तथापि त्यांच्या पत्नी गोजरताई भामरे मात्र आमदार झाल्या. डॉ.सुभाष भामरे यांची जडणघडण अशा राजकीय वातावरणात झाली. मुळातच अभ्यासू असलेल्या डॉ.सुभाष भामरे यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न्ा पाहिलं होतं. त्यामुळे राजकारणात करियर हा विषय त्यांच्या अजेंड्यावर प्रारंभीच्या टप्प्यात नव्हता. तो वसा त्यांचे बंधू सुरेश रामराव पाटील यांनी चालविला. एक निष्णात कॅन्सर तज्ज्ञ म्हणून डॉक्टर भामरे नावारुपाला येऊ लागले. त्यास सेवाभावी वृत्ती आणि अर्थप्राप्तीपेक्षा रुग्णाला पूर्ण न्याय, या भूमिकेची जोड लाभल्यामुळे डॉक्टर सुभाष भामरे म्हणजे देवदूत अशी प्रतिमा अल्पावधीत निर्माण झाली. व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर साधारण सन 2000 च्या सुमारास ते कॉग्रेसपक्षाच्या माध्यमातून राजकारणात भाग घेऊ लागले. धुळे शहर कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी या पक्षात मजल गाठली. यापुढील प्रगतीचे टप्पे गाठणं या पक्षात राहून शक्य नव्हतं. कारण कॉग्रेस-राष्ट्रवारीमधील करारानुसार धुळे शहर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीसाठी आरक्षित होता. सन 2004 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने डॉक्टर भामरे यांच्या प्रतिमेचा फायदा घेण्याचे ठरविले आणि त्यांना राष्ट्रवादीच्या राजवर्धन कमदबांडेंच्या विरोधात मैदानात उतरविले. कम्युनिस्ट विचारसरणी तसेच कॉग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या घराण्यातील एका व्यक्तीने शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षाशी केलेली हातमिळवणी तेव्हा टीकेचा विषय झाला होता. मात्र एक सेवाभावी डॉक्टर ही प्रतिमा अधिक प्रभावी ठरली. अपेक्षेप्रमाणे डॉ.भामरे यांनी राजवर्धन कदमबांडे यांना जोरदार टक्कर देत 50 हजार मते मिळविली. अवघ्या पाच हजार मतांनी डॉ.भामरेंचा पराभव झाला. यापूर्वीच्या निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराला एवढी मते मिळाली नव्हती. निवडणूकीतील पराभव आणि शिवसेना पदाधिका-यांकडून आलेल्या कटू अनुभवानंतरही डॉ.भामरे शिवसेनेत सक्रीय होते. 'बचेंगे ते और लढेंगे' ही त्यांची त्यावेळी दिलेली प्रतिक्रया किती सार्थ होती हे आज लक्षात येते. सन 2009 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतर्फे त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी अटकळ होती. मात्र डॉ.भामरे यांनी ऐनवेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ केले यांना उमेदवारी दिली, त्यांना अवघी 17 हजार मते मिळाली. तेव्हापासून निवडणूकीच्या राजकारणापासून दूर राहिलेल्या डॉक्टर भामरे यांनी आपल्या व्यवसायात पुन्हा झोकून दिले. रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन्स करणे ही डॉ.भामरेंची खासियत. पहाटे केंव्हा तरी झोपणारे डॉक्टर सकाळी 11 वाजता हसतमुखाने रुग्णांना भेटतांना दिसत. सन 2014 मध्ये देशात सुरु झालेल्या नमो लाटेचे वारे धुळे लोकसभा मतदार संघात स्वाभाविकच पोहचले होते. भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदार संघात उमेदवार बदलविला जाईल असे संकेत होतेच. त्यामुळे नव्या उमेदवाराच्या शोधासाठी विविध यंत्रणांच्या माध्यमातून भाजप धुरिणांची मोहिम सुरु होती. या सर्व यंत्रणांच्या अहवालामध्ये डॉक्टर सुभाष भामरेंचे नाव आघाडीवर होते. वैद्यकीय व्यवसातील उत्तुंग कामगिरीमुळे सर्व समाज, सर्व धर्म आणि सर्व जातींची मंडळी डॉक्टरांच्या संपर्कात होती. ज्या कुशल हाताच्या स्पर्शामुळे जीवघेण्या कॅन्सरचा अंश शरीराबाहेर काढण्यात यश लाभले, ते जीवदान देणारे हात जर मतं मागण्यासाठी जोडले जाणार असतील तर मत देण्याचं कुणी टाळणार नाही, हे राजकीय शहाणपण भाजपकडं नक्कीच होतं. यानिमित्ताने मुस्लीम बहुल मालेगावमधील मतांची बेगमी मिळाली तर ैनमोंचे हात अधिक मजबूत होणार होते. त्यामुळे डॉ.भामरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आणि सुमारे एक लाख मतांची आघाडी घेऊन ते निवडून आले. डॉ.भामरेंच्या प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्याच वेळी हा हिरा आम्ही राजमुकुटात परिधान करणार अशी ग्वाही दिली होती. त्याचे प्रत्यंतर नुकतेच आले. त्यामुळे देशाचे संरक्षण राज्यमंत्री म्हणून डॉ.सुभाष भामरे यांनी शपथ घेतली तेव्हा एका प्रामाणिक, सेवाभावी आणि सज्जन व्यक्तीचा झालेला सन्मान अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त झाली. डॉ.भामरे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करुन एकनाथराव खडसेंच्या राजीनाम्यामुळे झालेली हानी भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र या चर्चेत फारसे तथ्य नाही. विकासच्या प्रक्रियेत धुळे जिल्हा पिछाडीवर आहे हे सिध्द करणार अनेक समित्यांचे अहवाल शासन दरबारी आहेत. गुजरात राज्याच्या सीमेलगत असलेल्या धुळे जिल्ह्यातील श्रमशक्तीच्या घामावर गुजरातच्या समृध्दीचा डोलारा उभा आहे, अशी कबुली खुद्द नरेंद्र मोदी यांनी दिली होती. अप्रगत जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेल्या धुळे जिल्ह्यास प्रगतीपथावर आणणायचे असेल तर येथील नेतृत्वास सत्तेचे बळ देण्याची गरज होती. ते डॉ.सुभाष भामरेंच्या मंत्रीमंडळाच्या समावेशामुळे साध्य झाले आहे. विजय नवल पाटलांनंतर तब्बाल तीस वर्षांनी धुळे जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. मनमाड-नरडाणा-इंदूर हा रेल्वे मार्ग जिल्हयाच्या प्रगतीसाठी सशक्त रक्तवाहिनीची भूमिका बजावरणार हे नक्की. मात्र त्याशिवाय या परिसरात येणा-या उद्योगांसाठी ैनो टॅक्स झोनैसारखे पॅकेज देता येईल का? आंतरराज्य पाणी वाटपाशी निगडित तापी, नर्मदा या नद्यांवरील विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय जल आयोगाकडून निर्माण करणारे अडथळे दूर करता येतील का? इंडस्ट्रीयल कॉरीडोरचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी पाठपुरावा करणा-यांना वैधानिक आयुधांची उपलब्धी करुन देता येईल या बाबी डॉ.सुभाष भामरे यांना केंद्रात मंत्री करण्यामागे असाव्यात असे वाटते. जातीय समीकरणापेक्षा देश हित आणि विकासाशी निगडित राजकीय धोरणांचा अंगीकार करणा-या नरेंद्र मोदी सरकारकडून केवळ विशिष्ट गटाच्या तुष्टीकरणासाठी कुणाला मंत्री केले जाणार नाही हे सामाजिक भान जागृत झालेला नव मतदार जाणून आहे. हे नक्की.
(लेखक धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत )