ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ - मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या वाट्याच्या रिक्त जागा भरण्यास अखेर सोमवारी मुहुर्त सापडला आहे. सोमवारी सकाळी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांचे खंदेसमर्थक अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
काँग्रेसने राज्यातील मंत्रिमंडळाती रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधीही पार पडणार होता. मात्र नवीन मंत्र्याच्या नाव निश्चितीवर काँग्रेस नेतृत्वामध्ये एकमत होत नव्हते. रविवारी दिवसभर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पण अपेक्षीत तोडगा निघत नव्हता अखेरीस रात्री उशीरा नवीन मंत्र्यांची नावे निश्चित झाली.
सोमवारी सकाळी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी अमित देशमुख यांना राज्यमंत्रीपदाची तर सत्तार यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. देशमुख हे लातूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले असून सत्तार हे औरंगाबाद जवळील सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले आहे. सत्तार हे अशोक चव्हाण यांचे समर्थक मानले जात असल्याने अशोक चव्हाण यांचे राज्यातील वजन वाढत असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये रंगली आहे.